Pune District Cooperative Bank Pudhari
पुणे

Pune District Rabi Crop Loan: रब्बी हंगामात पुणे जिल्हा बँकेकडून ४७६ कोटींचे पीक कर्जवाटप

उद्दिष्टाच्या ६९ टक्के कर्जवाटप पूर्ण; ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) यंदाच्या रब्बी हंगामात 689 कोटी 32 लाख रुपयांइतके पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी दिनांक 31 डिसेंबर 2025 अखेर 476 कोटी 66 लाख 31 हजार रुपयांइतके (69.15 टक्के) पीक कर्ज वाटप पूर्ण झालेले आहे. यंदाच्या खरीप हंगामात उद्दिष्टांहून अधिक म्हणजे 120 टक्क्यांइतके पीक कर्जवाटप पूर्ण झालेले आहे. याचा विचार करता रब्बी हंगामात तुलनेने पीक कर्जवाटप कमी झाल्याचे दिसून येत आहे.

खरिपात मुबलक पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात पेरण्यांसाठी पोषक स्थिती होती. शिवारात पाणी उपलब्धता चांगली असल्याने पिकांच्या पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. पीडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना रुपये तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड केल्यास शून्य टक्के दराने दिले जाते. मात्र, यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय वाटप करण्यात आलेले पीक कर्ज कोटी रुपयांत पुढीलप्रमाणे. कंसात उद्दिष्टाच्या तुलनेत झालेल्या पीक कर्जवाटपाची टक्केवारी नमूद केली आहे. ः आंबेगांव 90.62 (102.57), बारामती 15.90 (50.49), भोर 25.77 (96.25), दौंड 14.44 (42.02), हवेली 8.91(85.65), इंदापूर 42.34(26.06), जुन्नर 92.16 (100.63), खेड 83.19 (103.71), मावळ 15.46 (89.13), मुळशी 19.98 (90.94), पुरंदर 42.71 (90.26), शिरूर 18.45 (26.22), वेल्हा 6.66 (107.87) यानुसार 63 हजार 717 शेतकरी सभासदांना सुमारे 476 कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटप पूर्ण झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. अद्यापही पीक कर्जवाटप सुरु असल्याने एकूण पीक कर्जवाटपात यापुढेही वाढ होईल, असे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना रब्बी पेरण्यांसाठी बि-बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांची वेळेवर खरेदी करता यावी, यासाठी जिल्हा बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या शून्य टक्के व्याज दराच्या कर्जाचा चांगला उपयोग होतो. गतवर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रब्बी हंगामासाठी एकूण 598 कोटी 35 लाख रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते.

त्यापैकी 27 डिसेंबर 2024 अखेरच्या अहवालानुसार म्हणजे याचवेळी 437 कोटी 91 लाख रुपयांइतके म्हणजे उद्दिष्टाच्या 73.19 टक्क्यांइतके पीक कर्जवाटप पूर्ण झाले होते. त्याचा विचार करता सद्यस्थितीत निश्चितच यंदाच्या रब्बी हंगामात अधिक पीक कर्जवाटप झाल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT