Eye Donation Pudhari
पुणे

Pune Eye Donation: पुणे जिल्ह्यात नेत्रदान चळवळीला ऐतिहासिक यश

पाच वर्षांत ३४७० कॉर्निया प्रत्यारोपण यशस्वी; जनजागृतीमुळे नेत्रदान मोहिमेला गती

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: 'माणूस गेल्यावर त्याची देह मातीत मिसळते, पण डोळे जिवंत राहतात' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत पुणे जिल्ह्यातील नेत्रदानाची चळवळ गेल्या पाच वर्षांत अत्यंत आश्वासक व प्रेरणादायी ठरली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२६ या काळात एकूण ३,४७० नेत्र बुबुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या असून, त्‍या सर्वांच्या जीवनमार्गातील अंधार दूर होऊ शकला आहे.

या नेत्रदान मोहिमेच्या यशामागे समाजातील दानशूर व्यक्ती, नेत्रपेढ्या आणि डॉक्टरांचे अहोरात्र कष्ट आहेत. विशेषतः २०२३-२०२४ या वर्षात १२२६ संकलनाचे उद्दिष्ट असताना ११७% पेक्षा जास्त साध्यता गाठत नेत्रदानाच्या चळवळीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

नेत्रदान हे 'महादान' मानले जाते. मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याची ही जिद्द पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर दाखवत आहेत. महापालिकेच्या आणि शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या जनजागृती मोहिमेमुळेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी या चळवळीला आपले मानले आहे.

तांत्रिक प्रगतीमुळे अनेक शस्त्रक्रिया सुलभ झाल्या असल्या, तरी दात्यांची कमतरता हे अजूनही मोठे आव्हान आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांतील ही आकडेवारी पाहता, पुणे जिल्हा नेत्रदानाच्या बाबतीत देशाला दिशा दाखवणारा जिल्हा म्हणून पुढे येत आहे, हे निश्चित आहे.

आमच्या विभागाकडून जिल्‍ह्यात नागरिकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात केले असल्याने आपण आपले उद्दिष्ट इतर जिल्‍ह्याच्या दृष्‍टीने पूर्ण केलेले आहे. पुण्याला सर्वांत जास्‍त टार्गेट असते आणि नागरिक जागरुक असल्याने आपण हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सलग तीन वर्षे मोतीबिंदूमध्ये आपण सलग प्रथम येत आहोत.
डॉ. अंजली कुलकर्णी, जिल्‍हा नेत्र चिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT