पुणे: सहकाराअंतर्गत सहकार या उक्तीप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रथमपासूनच काम करीत असून, हे सहकार चळवळ वाढीसाठी एक बळकट पाऊल असल्याचे गौरवोद्वागार पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी काढले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेली सुधारीत धोरणे, बँकांची प्रचलित धोरणांसोबत त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सुधारीत धोरणे, कार्यपद्धती व अंमलबजावणीबाबतचा कृती आराखडा तयार करण्याकरिता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बुधवारी ( दि. 24) महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करतांना डॉ. दुर्गाडे बोलत होते.
या कार्यशाळेस सनदी लेखापाल उदय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पटारे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरूंदकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र गाढवे व राज्य सहकारी बँक व महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रस्तविक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरव्यवस्थापक संजय शितोळे यांनी केले. ’भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ज्या सर्वसमावेशक सूचना नव्याने जारी केलेल्या आहेत.
त्याचे अनुपालन सर्व क्षेत्रीय स्तरावरील जिल्हा बँकांमध्ये व्हावे, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढाकार घेऊन काम करणार आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी एकत्र येवून कामकाज करण्याची गरज असल्याची अपेक्षाही प्रा. दुर्गाडे यांनी व्यक्त केली.