पुणे

Pune : नववर्षानिमित्त देवदर्शन अन् पर्यटन : पहिल्या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की, देवदर्शन आलेच… नवी ऊर्जा, नवी उमेद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकरांनी सोमवारी (दि.1) देवदर्शनाला प्राधान्य दिले आणि त्यामुळे पुण्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. देवदर्शनाचे निमित्त साधत अनेकांनी नवीन वर्ष सुख-समृद्धीचे, भरभराटीचे, मांगल्याचे जावो, अशी मनोकामना केली. पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सारसबाग, पर्वती आणि शनिवारवाडा परिसरही गर्दीने फुलला होता.

ऐतिहासिक शनिवारवाडा पाहण्यासाठी झालेली गर्दी… श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणारे… उत्सुकतेने सारसबागेत फिरायला आलेले लोक आणि पर्वतीवरील पेशवे संग्रहालय पाहण्यासाठी आलेले पर्यटक…. असे चित्र सोमवारी रंगले होते.
नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने आणि सुटी असल्याने अनेकांनी देवदर्शन आणि फिरण्याचे निमित्त साधले. त्यामुळेच पुण्यातील विविध मंदिरांमध्ये आणि पर्यटनस्थळी गर्दी झाली होती. अनेकांनी पुणे भ्रमंतीचा आनंद लुटला.

सारसबाग, पर्वती परिसराला लोकांनी भेट दिली. पुणे दर्शन करताना प्रत्येकामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंदिर, सारसबागेतील श्रीगणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, श्रीदत्त मंदिर आदी मंदिरांमध्ये गर्दी झाली होती. पर्वतीवरील मंदिर आणि संग्रहालयालाही भेट देत लोकांनी त्याबद्दल माहिती घेतली. ही गर्दी सायंकाळपर्यंत सर्वच ठिकाणी कायम होती.

बुधवार पेठ, कसबा पेठ आदी ठिकाणी गर्दीमुळे आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून छत्रपती श्रीशिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. छत्रपती श्रीशिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

शनिवारवाड्यावर सेलिब्रेशन

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी केली. गर्दीने शनिवारवाड्याचा परिसर फुलून गेला होता आणि पर्यटकांनी या ऐतिहासिक स्थळांचा समर्पक वारसा जाणून घेतला. वाड्याचे प्रवेशद्वार असो वा अंतर्गत भागातील दरवाजे… सगळीकडील ऐतिहासिक पाऊलखुणा जाणून घेताना प्रत्येकामध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. वाड्याच्या बाहेरील परिसरातही पर्यटकांची गर्दी होतीच, त्याशिवाय अनेकजण कॅमेर्‍यात छायाचित्रे आणि सेल्फी टिपताना पाहायला मिळाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT