Mosquito Pudhari
पुणे

Pune Dengue Cases: डेंग्यूचा वाढता धोका; पण पुण्यात सरसकट धूर फवारणी नाही! महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

रुग्णसंख्या आणि डासांची घनता पाहूनच होणार फवारणी; नागरिकांनी अनावश्यक मागणी करू नये, आरोग्य विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असताना डास नियंत्रणासाठी महापालिकेकडून धूर फवारणी केली जात असली, तरी प्रत्येक भागात सरसकट फवारणी केली जाणार नाही. ज्या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत किंवा डासांची घनता अधिक आहे, अशाच ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेऊन धूर आणि जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ आपल्या परिसरातही फवारणी करावी, अशी अनावश्यक मागणी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डेंग्यू-चिकुनगुनियाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत डास नियंत्रणाची मोहीम सुरू केली आहे. निवासी भाग, बांधकाम साईट आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात गरजेनुसार धूर व जंतुनाशक फवारणी केली जात आहे. दरम्यान, काही भागांतील धूर फवारणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने नगरसेवक आणि नागरिकांकडून इतर भागांतही फवारणीची मागणी होत आहे.

मात्र, अनावश्यक धूर फवारणीमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने डासांची घनता आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे. या वर्षी आतापर्यंत डेंग्यूचे १८२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकुनगुनियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने स्थायी समितीने डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.

डास नियंत्रणासाठी १५० कायमस्वरूपी पदे भरलेली असली, तरी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटस्पॉट भागात त्यांची प्राधान्याने नियुक्ती करण्याच्या सूचना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष कामावर उपलब्ध न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

धूर फवारणी ही प्रत्येक ठिकाणी करण्याची प्रक्रिया नाही. धुरामुळे हवेची गुणवत्ता बिघडून काही नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण किंवा डासांची घनता अधिक असलेल्या परिसरातच परिस्थितीनुसार धूर फवारणी केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण फवारणीची मागणी न करता डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.
डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT