पुणे: मान्सूनचे आगमन होताच शहरात किटकजन्य आजारांनी डोके वर काढले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात डेंग्यूचे तब्बल २२ बाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, जून आणि जुलै या अवघ्या दीड महिन्यात १८ रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार नगर रोड-वडगाव शेरी, कोथरूड आणि औंध-बाणेर या भागांत डेंग्यूचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, एप्रिलमध्ये कसबा-विश्रामबागवाडा आणि भवानी पेठ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
मे महिन्यात रुग्णसंख्या शून्य होती. परंतु, पावसाला सुरुवात होताच जून महिन्यात अचानक १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर जुलैच्या पहिल्या १५ दिवसांतच आठ रुग्णांचे निदान झाले आहे. एकूण २२ रुग्णांपैकी ७२ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण केवळ तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नोंदवले गेले आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांप्रमाणे रुग्ण
नगर रोड - वडगाव शेरी : ७ रुग्ण
कोथरूड : ५ रुग्ण
औंध-बाणेर : ४ रुग्ण
कोंढवा-येवलेवाडी : २ रुग्ण
ढोले पाटील रोड, घोले रोड-शिवाजीनगर, कसबा-विश्रामबागवाडा आणि भवानी पेठ प्रत्येकी एक रुग्ण
वडगाव शेरीत सर्वाधिक रुग्ण
पुणे महापालिकेच्या नगर रोड-वडगाव शेरी या भागात सर्वाधिक सात रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत, तर येरवडा-कळस धानोरी, धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मुंढवा, केशवनगर, वानवडी-रामटेकडी आणि बिबवेवाडी या उर्वरित भागांत सध्या एकही रुग्ण आढळलेला नाही.
साचलेले पाणी ठरतेय धोक्याचे कारण
पावसाळ्यात विविध ठिकाणी तुंबणारे पाणी, गृहनिर्माण संस्थांच्या आवारात साचलेली पाण्याची डबकी आणि बांधकाम क्षेत्रांवरील अस्वच्छता डासांच्या पैदाशीसाठी पोषक ठरत आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे महापालिकेने किटकप्रतिबंधक धूर फवारणी व तपासणी मोहीम तीव्र करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.