पुणे: नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस या वर्षी कमी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पाणीबचतीचा खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दिवसाआड पाणीकपात करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, येत्या आठवड्यातच दिवसाआड पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा सरासरी 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने दि. 31 जुलैपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल व पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी दरमहा 15 टक्के पाणी कपात करण्याबाबत महापालिकेला एप्रिल महिन्यात कळविले होते.
मात्र, पक्षनेत्यांच्या बैठकीत 31 मेपर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हवामान खात्याने वर्तविलेला कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीबचतीसाठी महापालिका हद्दीत दिवसाआड पाणीकपात करण्याचा प्रस्ताव आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिल्यास दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
...तर 25 टक्के पाणी बचत होणार
एक दिवसाआड पाणीकपात केल्यास पाणीपुरवठ्याच्या दिवशी पाइपलाइन नेटवर्कमध्ये प्रेशर राखणे आणि रिकाम्या लाइन भरणे यासाठी जादा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे एक दिवसाआड पाणीकपात केल्यास एकूण पाणीवापरामध्ये 25 टक्यांपर्यंत पाणीकपात होऊ शकते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा
खडकवासला धरण साखळी - 5.875 टीएमसी
भामा आसखेड धरण - 2.410 टीएमसी
रावेत पवना धरण - 2.198 टीएमसी
एकूण - 10.48 टीएमसी
शहरासाठी 31 जुलैपर्यंत 3.561 टीएमसी इतका पाणीसाठा आवश्यक आहे.
आयुक्तांनी घेतला आढावा
दिवसाआड पाणीकपातीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील उपलब्ध जलसाठा आणि सध्याचा होणारा वापर यासंबंधीचा आढावा घेतला. या बैठकीत आयुक्तांनीही पाऊस कमी पडणार असल्याने दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.