Daund SRPF Recruitment Exam Paper
पुणे : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेतील एसआरपीएफ गट 5 (दौंड) लेखी परीक्षेत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली असून परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक पुस्तकातील तब्बल १०० पैकी ८५ प्रश्न अक्षरशः जसेच्या तसे लेखी परीक्षेत विचारण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करताना विषय तज्ज्ञांकडून स्वतंत्रपणे प्रश्न तयार केले जातात, अशी अपेक्षा असते. मात्र या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर एकाच पुस्तकातील ८५ प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे “एकाच प्रकाशकाच्या पुस्तकातील एवढे प्रश्न पोलीस दलाच्या परीक्षेत कसे आले?” असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक परीक्षार्थींनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. ज्यांनी संबंधित पुस्तकाचा अभ्यास केला, त्यांना सरळ फायदा झाल्याची भावना इतर उमेदवारांमध्ये आहे.
या प्रकारावर विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक भरतीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.