सुनील कडुसकर, आशिष देशमुख, गणेश खळदकर, सुनील जगताप, प्रसाद जगतापप
पुणे: शहरात सुमारे १४ लाख वृक्ष असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद आहे खरे; मात्र कोणती झाडे कशा अवस्थेत आहेत, याची माहिती त्यांना नाही. कारण, अतिवृष्टी झाली अन् मोठी झाडपडी होऊन जीवितहानीसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, की महापालिका जागी होते अन् झाडांच्या फांद्या कापण्याचे काम करते. मात्र, अनेक झाडे वाकलेली असून, कधीही उन्मळून पडतील, अशी अवस्था आहे. मात्र, अशा वृक्षांचे सर्वेक्षण करायला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळ नाही. 'टीम पुढारी'ने अशा झाडांचे शहरभर फिरून सर्वेक्षण केले तेव्हा जागोजागी नागरिकांच्या जिवाला धोका वाटणारे वृक्ष दिसले. यांची छाटणी करावी किंवा पुनर्रोपण करावे, असा पर्याय नागरिकांनीच सुचविला आहे.
पर्वती भागात अनेक ठिकाणी धोका...
पर्वती भागातील मित्रमंडळ चौक ते पर्वती पायथा भागात सतत झाडपडी होतच असते. काही दिवसांपूर्वी येथे एक खूप जुने भले मोठे वडाचे झाड एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेल्या अंगावर पडून ती गंभीर जखमी झाली. तरीही महापालिकेने या भागातील पडायला आलेल्या झाडांचे सर्वेक्षण केलेले नाही. पर्वती पायथा ते तळजाई आणि पुढे धनकवडीपर्यंतच्या मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळात असे धोकादायक वृक्ष आहेत. जे कधी उन्मळून पडतील ते सांगता येत नाही.
फांद्या घुसल्या वीजतारांमध्ये; अपघाताला निमंत्रण
हडपसर व परिसरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला असलेली जुनी झाडे आणि त्यांच्या वाढलेल्या धोकादायक फांद्यांमुळे अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या फांद्या कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेषतः हडपसर गाडीतळ, सोलापूर रस्ता, मगरपट्टा चौक आणि वैदूवाडी परिसरातील मुख्य रस्त्यांवर झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांमध्ये आणि पथदिव्यांमध्ये अडकल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
धोकादायक फांद्या छाटा
शहरातील प्रमुख रस्त्यांवर धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, यामुळे वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. उजवा मुठा कालवा (राईट कॅनॉल) रोड आणि सिंहगड रस्त्यावर झाडाच्या आलेल्या फांद्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असून, उद्यान विभागाने मोहीम तत्काळ हाती घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
मागील आठवड्यात उजवा मुठा कालवा रस्त्यावरून क्लासला जाणाऱ्या एका दुचाकीस्वार विद्यार्थ्याच्या डोक्यावर अचानक झाड कोसळले. सुदैवाने हेल्मेट घातलेले असल्याने विद्यार्थ्याचा जीव वाचला; मात्र त्याच्या हाताला आणि खांद्याला किरकोळ दुखापत झाली. 'दैनिक पुढारी'च्या प्रतिनिधीने उजवा मुठा कॅनॉल रोडची नुकतीच पाहणी केली असता, रस्त्यावर झुकलेली अनेक धोकादायक झाडे अन् फांद्या निदर्शनास आल्या.
सिंहगड रस्त्यावरही झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्या असून, पावसाळ्यात झाडे किंवा फांद्या पडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात एका पीएमपीएमएल बसवर झाड पडून चालकाचा मृत्यू झाला होता, तर रिक्षावर झाड कोसळून एका महिलेला प्राण गमवावे लागले होते.
पावसाळ्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने महापालिका प्रशासनाने अन् विशेषतः उद्यान विभागातर्फे शहरात त्वरित सखोल पाहणी करावी. उजवा मुठा कालवा आणि सिंहगड रस्त्यासह सर्व प्रमुख रस्ते व उपमार्गांवरील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या निवडून त्यांची तातडीने छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
झुकलेल्या वृक्षराजींकडे दुर्लक्ष
मित्रमंडळ ते सहकारनगर या मार्गावरील अनेक वृक्ष धोकादायक अवस्थेत असून, महापालिकेकडून सुरू असलेली वृक्षछाटणी केवळ वरवरची असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक झाडांच्या इमारती लगतच्या फांद्या छाटण्यात आल्याने बऱ्याच वृक्षांचा तोल बिघडला असून, ते केव्हाही रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे.
या मार्गावरील अनेक वृक्षांच्या मोठ्या फांद्या रस्त्याच्या दिशेने झुकल्या आहेत. पावसाळ्यात वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर या फांद्या किंवा संपूर्ण वृक्ष कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या परिसरातील अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ वरवरची छाटणी न करता धोकादायक फांद्या आणि जीर्ण वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
दरम्यान, अवघ्या दहा-बारा दिवसांपूर्वी पर्वती पायथ्यालगत एक मोठा जुना वृक्ष कोसळून एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतरही धोकादायक वृक्षांबाबत प्रभावी उपाययोजना झालेली दिसून येत नाही.
दुचाकीचालकांचा जीव टांगणीला
शहरात एकीकडे रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली, तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे कधीही कोसळतील, अशा परिस्थितीत आहेत. मात्र, महापालिकेकडून या धोकादायक झाडांची छाटणी करण्याऐवजी केवळ झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहेत. त्यामुळे दुचाकीचालक, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यांवरून जावे लागत असल्याची तक्रार सजग नागरिकांनी केली आहे.
शहरातील प्रभात रस्ता, नवी पेठ, लोकमान्यनगर, लॉ कॉलेज रोड या भागांत मोठमोठे डेरेदार वृक्ष आहेत. परंतु यातील काही झाडे रस्त्यांच्या बाजूला झुकलेली असून, कधीही रस्त्यांवर कोसळतील, अशा स्थितीत आहेत. या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांचा धोकादायक भाग तातडीने काढून टाकणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या जीवाला या झाडांपासून धोका निर्माण झाल्यानंतर महापालिकेला जाग येणार का? असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातही झाडपडीच्या घटना घडल्याचे दिसून येते. परंतु, धोकादायक झाडे काढण्याऐवजी महापालिकेकडून झाडांच्या केवळ छोट्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे धोकादायक झाडांचा सर्व्हे करून या झाडांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेचे वरातीमागून घोडे
मे महिन्यातच रस्त्यांवरच्या खड्ड्यांची दुरुस्ती करणे, सांडपाण्याच्या, तसेच अन्य पाण्याची लाईन असलेल्या चेंबरची पाहणी करून दुरुस्ती करणे, धोकादायक झाडांच्या फांद्याची छाटणी किंवा आवश्यकता असेल तर धोकादायक झाडे तोडण्याचे काम पावसाळ्यापूर्वीच महापालिकेकडून होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आता शहरात पावसाने वेग धरल्यानंतर झाडांच्या फाद्यांची छटाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे महापालिकेचे वरातीमागून घोडे असल्याचे देखील संबंधित सजग नागरिकांनी स्पष्ट केले आहे.