डाळज येथे भीषण अपघातात पाच ठार झाले Pudhari News Network
पुणे

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार

कारचा टायर फुटला अन् पावसाने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

पुढारी वृत्तसेवा

भिगवण/पळसदेव : मुंबईला फिरायला गेलेल्या तेलंगणाच्या पाच युवकांवर मंगळवारी (दि.२) काळाने घाला घातला. या युवकांच्या गाडीला भिगवण पोलिस ठाणे हद्दीतील डाळज येथे भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही, त्यात चारचाकीचा टायर फुटला आणि गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ मंगळवारी (दि. २) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात इरफान पटेल (वय २४), मेहबूब कुरेशी (वय २४), फिरोज कुरेशी (वय २६), फिरोज कुरेशी (वय २८) आणि रफिक कुरेशी (वय ३४) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अमीर सय्यद (वय २३, सर्व रा. नारायणखेड, ता. जि. मेंढक, राज्य तेलंगण) हा तरूण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर भिगवण येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व जखमी हे सर्वजण मुंबईला बलेनो (टीएस ०७ जीएल २५७४) या गाडीने फिरायला गेले होते. परत माघारी तेलंगणला जाताना डाळज येथे त्यांची कार आली असता मुसळधार पावसामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीचा टायर फुटला. त्यामुळे गाडी मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर येऊन मोरीला धडकली व भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

अपघातानंतर पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. महामार्ग पोलिस व भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT