25 दिवस… 70 अपघात अन् 31 जणांचा मृत्यू; 54 जण किरकोळ अन् गंभीर जखमी

25 दिवस… 70 अपघात अन् 31 जणांचा मृत्यू; 54 जण किरकोळ अन् गंभीर जखमी

[author title="महेंद्र कांबळे" image="http://"][/author]

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर शहरात तब्बल 70 हून अधिक अपघातांच्या घटना घडल्या. तर 31 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिस दप्तरी दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून समोर आली आहे.

दि. 19 मेच्या मध्यरात्री मद्य प्राशन करून एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून जाणार्‍या तरुण- तरुणीला उडवले होते. यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला त्याच्या घरच्यांकडून वाचविण्याचा प्रयत्न झाला. आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, राजकीय व्यक्ती व अल्पवयीन मुलाला निबंध लेखनाची देण्यात आलेली शिक्षा, यामुळे नेटकर्‍यांनी समाजमाध्यमांवर यंत्रणांना चांगलेच फैलावर घेतले. स्थानिक माध्यमांबरोबरच राष्ट्रीय माध्यमांनी देखील ही अपघाती घटना गांभिर्याने घेतली. त्यामुळे विविध यंत्रणांच्या चुका यानिमित्ताने पुढे आल्या.

त्याच धर्तीवर 19 मे नंतर 14 जूनपर्यंत शहरातील अपघातांच्या घटनांचा आढावा घेतला असता शहरात 25 दिवसांत सुमारे 70 हून अधिक अपघाताच्या घटनांची नोंद झाली आहे.

54 जण किरकोळ अन् गंभीर जखमी

त्यामध्ये तब्बल 31 जणांना आपला जीव गमवावा लागला, असून यामध्ये 54 जण किरकोळ आणि गंभीररीत्या जखमी झाल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. सर्वात जास्त अपघातांच्या घटना हडपसर (15) पोलिस ठाण्याच्या हद्दीत, त्यापाठोपाठ भारती विद्यापीठ (8), त्यानंतर कोंढवा (7) पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे आढळून आले आहे.

काही चालक मद्यपी, तर काही घटनेनंतर झाले पसार

दाखल झालेल्या अपघातांच्या या घटनांमध्ये सात ते आठ घटनांमध्ये चालक अपघातानंतर पळून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर काही घटनांमध्ये चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

वाहनांचा वेग घेतोय नागरिकांचा जीव

शहरात सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्या बरोबरच विविध कामांसाठी रस्ते खोदाई झाली असताना काही ठिकाणी काम पूर्ण होऊनदेखील रस्ते व्यवस्थितरीत्या बुजवले गेले नाहीत. या सर्वांमुळे वाहतुकीवर ताण निर्माण होत आहे. त्याबरोबरच रस्ते विविध कामांमुळे लहान झाले असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही बिकट झाला आहे. यातच भरधाव वाहनांचा वेग नागरिकांचा जीव घेत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news