Road Tender Controversy Pudhari
पुणे

Pune Cycle Race Road Tender: सायकल स्पर्धेसाठी ६२७ कोटींचे रस्ते; ‘मर्जीतील’ ठेकेदारांसाठी नियम शिथिल करण्याचा घाट?

पुणे जिल्ह्यात ८१७ किमी रस्त्यांची कामे; निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, पात्रता कागदपत्रांच्या तपासणीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जिल्ह्यातील रस्ते चकाचक करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. पुरंदर, मावळ, मुळशी, राजगड आणि खेड तालुक्यांतील रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेत नियम शिथिल करून ‘मर्जीतील’ ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा सुरू झाल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेसाठी दर्जेदार रस्ते तयार होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

पुढील वर्षी होणारी सायकल स्पर्धा तब्बल १ हजार ९९ किलोमीटर अंतराची असून, ३३१ गावांतून ती जाणार आहे. यासाठी सुमारे ८१७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार असून, त्यासाठी ६२७ कोटी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४१३ किलोमीटर रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

‘मर्जीतील’ ठेकेदारांना पात्र करण्याचा प्रयत्न?

मावळ, मुळशी, राजगड, खेड आणि पुरंदर तालुक्यांतील रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही अपात्र ठेकेदारांना नियम शिथिल करून पात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. कामाचा आवश्यक अनुभव नसतानाही खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडणे, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसतानाही पात्रता मिळविणे, अशा प्रकारे निविदा प्रक्रियेत फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारांनाच कामे मिळत असल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे. एका अधिकाऱ्याच्या निकटवर्तीय ठेकेदार कंपनीवर विशेष कृपादृष्टी दाखविण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा बांधकाम विभागात आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामे एकत्र करून स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न?

सायकल स्पर्धेसाठी दर्जेदार रस्ते आवश्यक असताना निविदा प्रक्रियेत अधिकाधिक ठेकेदार सहभागी होऊन स्पर्धा वाढणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक कोटी रुपयांची कामे एकत्रित करून मोठ्या रकमेच्या निविदा काढण्यात आल्याने लहान आणि स्थानिक ठेकेदारांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील अटी नेमक्या कोणाच्या हितासाठी ठरविण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कागदपत्रांची काटेकोर तपासणी होणार का?

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची कामे करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दर्जाचे कौतुकही झाले होते. यंदा मात्र कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी पात्र ठेकेदारांचीच निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे निविदांमध्ये सादर केलेली अनुभव प्रमाणपत्रे, यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि अन्य पात्रता कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाणार का, अपात्र ठेकेदारांना निविदा प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखविला जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT