Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Cyber Fraud: पॅरिसहून येणारा ‘मित्र’ निघाला सायबर भामटा; पुण्यातील तरुणीला २१.८९ लाखांचा गंडा

दिल्ली विमानतळावर कस्टमने पकडल्याची बतावणी; व्हिसा, तिकीट, बँक अधिकारी आणि करन्सी कन्व्हर्जनच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सायबरचोरांनी एका तरुणीची तब्बल २१ लाख ८९ हजार ५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरांविरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला. सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून मैत्री केल्यानंतर फ्रान्सहून भारतात येत असताना दिल्ली विमान तळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याची बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने, शहजाद अहमद शेख या नावाने सोशल मीडियावर खोटी प्रोफाईल तयार करून तरुणीला मैत्रीच्या जाळ्यात खेचले. आरोपीने आपण फ्रान्समधील पॅरिस येथे असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर भारतात येत असताना आपल्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम असल्याने दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीशी व्हॉट्सॲप वरून संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने आपण इमिग्रेशन विभागातील अधिकारी असून, ‘फ्रान्स लेमन’ असल्याचे खोटे नाव सांगितले.

संबंधित व्यक्तीला सोडवण्यासाठी व्हिसा डॉक्युमेंट क्लिअरन्स, तिकीट बुकिंग, बँक ऑफिसर तसेच करन्सी कन्व्हर्जनसह विविध कारणे पुढे करण्यात आली. या कारणांसाठी तरुणीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तसेच यूपीआय आयडीवर वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.

आरोपींनी तरुणीचा विश्वास संपादन करून २१ लाख ८९ हजार उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT