Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर फसवणुकीच्या 7 घटना; नागरिकांना 78 लाखांचा गंडा

ऑनलाइन ट्रेडिंग, जॉब ऑफर, विमान तिकीट रिफंड आणि टूर पॅकेजच्या आमिषाला नागरिक बळी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना लक्ष्य करत ऑनलाइन गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग, जॉब ऑफर, विमान तिकीट परतावा, कस्टमर केअर आणि पर्यटन पॅकेजच्या नावाखाली तब्बल 78 लाख 31 हजार 903 रुपयांना गंडा घातल्याच्या सात घटना समोर आल्या आहेत. शहरातील विविध पोलिस ठाण्यांत स्वतंत्र सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नारायण पेठेतील 32 वर्षी ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरांनी 8 लाख 3 हजार 332 रुपये उकळले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर धानोरी येथील 29 वर्षीय तरुणालाही अशाच प्रकारे ट्रेडिंगच्या नावाखाली 5 लाख 43 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणाचा तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.

कोंढवा परिसरातील 44 वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन जॉब ऑफर देण्याचे आमिष दाखवून 4 लाख 27 हजार 846 रुपये उकळण्यात आले असून, येवलेवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोंढवा बुद्रुक येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाही ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरांनी लक्ष्य केले. अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांची 19 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वानवडी येथील 56 वर्षीय व्यक्तीला विमानाचे तिकीट रद्द करून रिफंड मिळवून देण्याचे सांगत आरोपींनी मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. ती डाऊनलोड करताच बँक खात्याची माहिती हॅक करून 6 लाख 14 हजार 953 रुपये लंपास करण्यात आले. या प्रकारामुळे एपीके फाईलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा धोका पुन्हा समोर आला आहे.

मलेशिया टूरच्या अमिषाला भुलला अन्‌‍ पावणेनऊ लाख गमावले

विमाननगर येथील 52 वर्षीय व्यक्तीला मलेशिया टूरचे आमिष दाखवत सन हॉलिडे ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक नरेश लालचंद मिरवाणी (रा. उंड्री) याने 8 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

जास्त परताव्याच्या लोभातून गमावले 26 लाख

सेनापती बापट रस्त्यावरील 48 वर्षीय व्यक्तीला “जास्त परतावा आणि हमखास नफा”चे आमिष दाखवत तब्बल 26 लाख 17 हजार 772 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT