Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; लिंक, ट्रेडिंग आणि आयफोन आमिषातून कोट्यवधींची फसवणूक

येवलेवाडी, लोहगाव, येरवडा भागांत अनेकांना गंडा; स्वस्त आयफोनच्या आमिषाने तरुणाची लाखोंची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लिंक डाउनलोड करण्यास भाग पाडून येवलेवाडी, लोहगाव, येरवडा, काळेपडळ परिसरात सायबर चोरट्यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे.

येवलेवाडी परिसरातील 31 वर्षीय तक्रारदार महिलेला आरोपींनी लिंक पाठवून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर यूपीआय आणि विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची 14 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी लोहगावमधील 48 वर्षीय व्यक्तीला ‌‘अमेरिकन डॉलर ट्रेडिंग‌’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखूवन तब्बल 69 लाखांना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून रक्कम उकळली आहे. काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत.

हडपसरच्या सातवनगर परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय व्यक्तीला व्हॉट्‌‍सॲपवरून लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. जास्त परताव्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून 14 लाख 9 हजार 500 रुपये उकळले. तसेच उंड्रीतील 58 वर्षीय व्यक्तीची 5 लाख 51 हजार 736 रुपयांची फसवणूक केली.

आयफोनच्या नादात 46 लाख गमावले

आयफोनवरील दहा हजार रुपयांची सूट कात्रज येथील एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. बाजारभावापेक्षा स्वस्त दरात आयफोन देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी या तरुणाची तब्बल 46 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी, 36 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादी तरुणाला फोन करून आयफोन 17 प्रो हा फोन बाजारभावापेक्षा दहा हजार रुपयांनी स्वस्त देतो, असे प्रलोभन दाखवून आपल्या जाळ्यात खेचले. यानंतर फोन ऑर्डर करण्याच्या नावाखाली वेळोवेळी बँक खात्यावर तब्बल 45 लाख 75 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT