Cyber Fraud Pune Pudhari News Network
पुणे

Pune Cyber Fraud Gas Scam: गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती; पुण्यात सायबर चोरट्यांकडून १६ लाखांची फसवणूक

खराडीतील ज्येष्ठ महिलेसह दोघांना बनावट एपीके फाइलद्वारे गंडा; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत ज्येष्ठ महिलेसह दोघांची 16 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी येथील एका ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी 11 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत 72 वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महिला मूळच्या मुंबईतील अंधेरी भागातील आहेत.

सध्या त्या खराडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी 11 फेबुवारी रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. पाइपद्वारे गॅसपुरवठा वितरित करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केले. गॅसदेयक थकीत आहे. थकीत देयक न भरल्यास गॅसपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखवली.

चोरट्यांनी त्यांना थकीत गॅसदेयक एपीके फाइलच्या माध्यमातून पाठविले. संबंधित एपीके फाइल उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन खात्यातून तब्बल 11 लाख 94 हजार रुपये काढून घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

सायबर चोरट्यांकडून पाच लाख 37 हजारांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी विमाननगर परिसरात एकाची पाच लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका 45 वर्षीय नागरिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर 10 फेबुवारीला थकीत गॅसदेयकबाबतचा संदेश पाठविला. थकीत गॅसदेयक एपीके फाइलच्या माध्यमातून पाठविण्यात आले. ही फाइल उघडताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून पैसे चोरले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT