पुणे: डिजिटल गोल्ड, शेअर मार्केट गुंतवणूक आणि भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील तीन नागरिकांची तब्बल ८८ लाख ४२ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर, स्वारगेट आणि मुंढवा पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सायबर पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल गोल्ड खरेदी-विक्रीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. आरोपींनी त्यांना एक वेबलिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
सुरुवातीला अल्प रकमेची गुंतवणूक करून त्यावर नफा दाखविण्यात आला. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. या प्रकारात संबंधित ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८१ लाख ३ हजार ८६० रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार २४ डिसेंबर २०२४ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडला.
दरम्यान, स्वारगेट पोलिसांत दाखल झालेल्या दुसऱ्या प्रकरणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगून एका व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात आले. आरोपींनी विविध माध्यमांतून संपर्क साधून गुंतवणुकीसाठी पैसे उकळले. मात्र, नफ्याचे आश्वासन फोल ठरत संबंधित व्यक्तीची २ लाख ९८ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. हा प्रकार १२ ऑगस्ट २०२४ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तिसऱ्या प्रकरणात मुंढवा परिसरातील एका व्यक्तीला 'चोला इन्व्हेस्ट प्रोग्राम' नावाच्या कथित गुंतवणूक योजनेत सहभागी करून घेण्यात आले. आरोपींनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेत अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीत आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवत विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. यात संबंधित व्यक्तीने ४ लाख ४० हजार रुपये गमावले.