पाटस : पाटस (ता. दौंड) गावातील तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. विशेष म्हणजे, या तरुणाचे दोन्ही पाय तारेने घट्ट बांधल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, यवत पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस पथकाने मृतदेह तलावातून बाहेर काढून त्याचा पंचनामा केला आहे. तर डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली. प्राथमिक पाहणीत मृताच्या पायांना तार बांधल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. यवत पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.