

पुणे: पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस ठाण्यात तोडफोड करत चांगलाच राडा घातला. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. पोलीस गुन्हेगाराला पकडा गेले असताना त्याने पोलिसांच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारला. त्यानंतर देखील पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्याने प्रचंड तोडफोड करत दहशत माजवली.
ही घटना काल (१७ जुलै) रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घडली. राजू उर्फ बारक्या लोंढे असं या आरोपीचं नाव असून तो आधीपासूनच गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Pune News)
बारक्या लोंढे याने पोलिसांकडे असताना अचानक आक्रमक होत पेपर स्प्रेचा वापर करत थेट ४–५ पोलिसांच्या तोंडावर फवारणी केली, ज्यामुळे संबंधित पोलिसांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं. या स्प्रेच्या परिणामाने पोलिसांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांत जळजळ आणि चक्कर येणे असे त्रास झाले.
त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. उलट, त्याने थेट पोलीस ठाण्यातच काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या आणि आरडाओरड करत स्वतःलाच जखमी करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली.