Jail Pudhari
पुणे

Pune Crime: पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव, पिस्तुलासह सुपारी घेणाऱ्याला बेड्या

आठ जणांनी मिळून दिली सुपारी, सुपारी देण्यात महिलांचाही सहभाग.

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे, पुणे

पुणे : पूर्वी झालेल्या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आठ जणांनी एकत्र येत सराईताच्या खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेळीच कारवाई करत खुनाचा डाव उधळून लावला आहे. याप्रकरणी एका पिस्तुलासह दोन काडतुसे बाळगणाऱ्या सराईताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर खुनाची सुपारी देणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल, शंकर पवार यांच्या घराजवळ, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणात सिंधू धोत्रे उर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नू झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रस्ता, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अपर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अपर बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता, दांडेकर पूल येथे कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडणी विरोधी पथक १ चे अंमलदार परिसरात पेट्रोलिंग करत असताना गांजवे चौकात आल्यानंतर पोलिस हवालदार सचिन माळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दांडेकर पूल परिसरात गणेश रेणुसे, सुमित माने, निशांत राऊत, अमन झरेकर तसेच इतरांनी टोळी तयार करून एकाचा खून करण्याचा कट रचला आहे. त्याचाच भाग म्हणून एक पिस्तुल आणून ते बाळ्या नावाच्या सराईत गुन्हेगाराला दिल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, बाळ्या नावाची व्यक्ती दांडेकर पूल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या कमरेला उजव्या बाजूला पिस्तुल खोचलेले आढळले. त्याचे नाव विचारल्यानंतर त्याने आपले नाव चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव असल्याचे सांगितले. सध्या दांडेकर पूल येथे राहत असून मूळचा सोलापूर येथील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथील असल्याचे त्याने स्पष्ट केले.

पिस्तुलाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याला खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात आणून चौकशी केली असता सिंधू धोत्रे उर्फ आक्का, सिन्नू झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर, सुमित माने, निशांत राऊत व बापू कांबळे यांनी एकत्र येऊन सप्टेंबर २०२५ मध्ये पिस्तुल विकत आणल्याचे समजले. हे पिस्तुल त्यांनी संतोष उर्फ भावड्या साळुंखे याचा खून करण्यासाठी विकत आणले होते.

ते बाळ्याला सुमित माने याच्या मार्फत देण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्‍त (गुन्‍हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे (गुन्‍हे) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रणजित फडतरे, अमोल आवाड, सचिन माळवे, रहिम शेख, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे पाटील आदींच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

म्‍हणूनच रचला खुनाचा कट

अधिक चौकशीत गणेश रेणुसे व संतोष साळुंखे यांच्यात २०२४ मध्ये भांडणे झाली होती. त्या भांडणात संतोष साळुंखे याला कोयत्याने मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा बदला संतोष साळुंखे घेणार असल्याची माहिती सिंधू धोत्रे उर्फ आक्का यांच्यासह इतरांना मिळाली होती. मात्र, संतोष साळुंखे याच्याकडून काही हालचाली होण्यापूर्वीच त्यांनी साळुंखेच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी ३५ हजार रुपयांत पिस्तुल विकत आणण्यात आले होते. ते बाळ्याच्या ताब्यात देण्यात आले. या सुपारीचे पैसे त्याला काम झाल्यानंतर देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी कारवाई करून आरोपी टोळीचा डाव हाणून पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT