Pune Crime : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुरड्यांसह संपवले जीवन

Pune Crime : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुरड्यांसह संपवले जीवन
Published on
Updated on

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला आणि चारित्र्याच्या संशयाला कंटाळून एका ३० वर्षीय विवाहितेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह आणि अवघ्या चार महिन्यांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. रविवारी (दि. १) दुपारी थोरस्थळ वस्ती येथील विहिरीत या तिघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

अहिला ऊर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, सार्थक (५ वर्षे) आणि अवघ्या चार महिन्यांची चिमुरडी गौरी या निष्पाप मुलांचाही या घटनेत अंत झाला आहे. मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार (बीबी) येथील असलेल्या भाग्यश्री सध्या आपल्या कुटुंबासह पाबळ येथील थोरस्थळ वस्तीवर राहत होत्या.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी भाग्यश्री आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात भांडण झाले होते. या वादानंतर चिडलेल्या आणि मानसिक तणावात असलेल्या भाग्यश्री आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. दुपारच्या सुमारास जेव्हा पतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा परमेश्वर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत चार महिन्यांच्या गौरीचा मृतदेह तरंगताना दिसला. या भयावह दृश्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली असता, शोध मोहिमेनंतर भाग्यश्री आणि त्यांचा मुलगा सार्थक यांचेही मृतदेह विहिरीच्या तळाशी मिळून आले.

चारित्र्याचा संशय.. अन् संसार उध्वस्त

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, पती राजू जाधव हा पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. यावरून घरात रोज वाद उद्भवत होता. त्यातूनच मानसिक छळाला कंटाळून भाग्यश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिलेची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news