

पुणे: विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारुन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. साहिल सादिक शेख (वय २१, रा. इंदिरानगर, बर्मा शेल, लोहगाव) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई सचिन पवार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल शेखला एका गु्न्ह्यात विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ३१ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार होती. त्या वेळी शेखने उलटी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली.
पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील कक्षात त्याला ठेवण्यात आले होते. त्या वेळी पोलीस शिपाई पवार त्याच्याबरोबर होते. शेखने पवार यांचा हात झटकला. पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस शिपाई पवार यांनी प्रसंगावधान राखून शेख याला ताब्यात घेतले. शेख याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुगडे तपास करत आहेत. गेल्या महिन्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीतून एकाने उडी मारुन आत्महत्या केली होती.