पुणे : फोनवर बोलताना झालेल्या ओळखीतून तिने एका पोलिस कर्मचार्याला हनीट्रॅपमध्ये अडकविले. त्यानंतर जवळीक साधून आपल्या घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. यानंतर पोलिसाला बलात्काराची खोटी केस दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणीस्वरूपात सोफा, कुलर, होम थिएटर, सोने-चांदीचे दागिने अशा पावणेदोन लाख रुपये किमतीच्या वस्तू खरेदी करून घेतल्या. मात्र, पोलिसाने आणखी पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार देताच त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या महिलेने अशाच प्रकारे हनीट्रॅमध्ये अडकवून कंधार आणि नांदेडमधील दोन तरुणांवर बलात्कार, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले अन् अखेर तिचे बिंग फुटले. याबाबत आंबेगावमधील 31 वर्षांच्या पोलिस कर्मचार्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आळंदीतील महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. हा प्रकार 5 नोव्हेंबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान या महिलेच्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक एक येथे कर्तव्यावर आहेत. तर आरोपी महिला पीएमपीमध्ये वाहक म्हणून नोकरीस आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये ते भोसरीत बंदोबस्तावर होते. विश्रांतीसाठी थांबलेल्या ठिकाणी एका पीएमपी बसचालकाने त्यांच्या मोबाईलवरून आपल्या वाहक महिला सहकार्याला फोन केला होता. चार दिवसानंतर फिर्यादीला त्याच मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आरोपी महिलेने आपले नाव सांगून ती पीएमपीमध्ये कंडक्टर (वाहक) असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने फिर्यादीसोबत विविध कारणाने जवळीक निर्माण केली. कधी मदतीच्या बहाण्याने तर कधी अन्य कारण सांगून ती फिर्यादीला आपल्याकडे बोलावू लागली.
एकेदिवशी शेजारील एक व्यक्ती त्रास देत असल्याचे कारण सांगून आरोपी महिलेने फिर्यादीला आपल्या आळंदीतील घरी बोलावून घेतले. तिने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात खेचून शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. बाहेर फिरण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर महिलेने फिर्यादींसोबत फोटो काढले होते. सहा महिन्यांनंतर आरोपी महिलेला फिर्यादीला दोघांचे फोटो त्यांच्या घरच्यांना पाठवून देण्याच्या धाकाने ब्लॅकमेल करू लागली. तू माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, असे धमकावून फिर्यादीच्या फायनान्सच्या खात्यावरून कुलर, मोबाईल, होम थिएटर, सोने-चांदीचे दागिणे अशा एक लाख 15 हजार रुपयांच्या वस्तू खंडणीस्वरूपात खरेदी करून घेतल्या. त्यानंतर 57 हजार 300 रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले. फिर्यादीने कोठे तक्रार देऊ नये म्हणून काही पैसे महिला त्यांना परत पाठवित होती.
सतत होणार्या त्रासाला वैतागून फिर्यादीने महिलेसोबत संबंध तोडून टाकण्याचे ठरविले असता, त्यांच्याकडे तिने पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा, पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे धमकाविले. परंतु, फिर्यादींनी पाच लाख रुपये देण्यास नकार दिला असता, तिने त्यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात 8 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार, अॅस्ट्रॉसिटीसारखा गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर फिर्यादी चौकशी केल्यावर या महिलेने अशाच प्रकारे 2017 मध्ये नांदेडमधील एक तरुण व 2022 मध्ये कंधारमधील एका तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून स्वखुशीने शरीरसंबंध ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळली. त्यांच्याविरुद्ध बलात्कार व अॅस्ट्राॅसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. या महिलेने फिर्यादी यांच्यासह इतरांची फसवणूक करून धमकी देऊन खंडणी उकळल्याने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड तपास करीत आहेत.