

सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर परिसरातील आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या 100 बेडच्या आरोग्य पथकासाठी वाघळवाडीतील दहा एकर गायरान जागा देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून, प्रत्यक्ष इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुग्णालयाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला होता. त्या वेळी त्यांनी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा केली होती. (Latest Pune News)
तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीच्या अधिनस्त 77 कोटी 79 लाख निधीचे 100 खाटांचे ‘आरोग्य पथक’ बाबत घोषणा करत 64 कोटींचा निधीही दिला होता. हे आरोग्य पथक कारखान्याच्या जागेत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, कारखाना आणि शिक्षण संस्था यांना असलेली जागेची गरज आणि तांत्रिक अडचणींमुळे या पथकाच्या उभारणीसाठी मर्यादा येत होती. वाघळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत ग्रामपंचायतीकडे सह्यांचे निवेदन दिले होते. त्यानंतर सरपंच अॅड. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत एकमताने दहा एकर गायरान जागा देण्याचा ठराव झाला.
या ठरावानंतर पवार यांनी जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तत्कालीन उपअभियंता रामसेवक मुखेकर व माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागेची पाहणी झाली. सर्व निकष पूर्ण असल्याची माहिती पवार यांना देण्यात आली आणि त्याच दिवशी पथक उभारणीस ग्रीन सिग्नल मिळाला होता. जागेबाबतचा प्रस्ताव प्रांताधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे सादर केला होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 64 कोटींच्या शंभर बेडची अत्याधुनिक आरोग्य पथकाची उभारणी होईल. त्याद्वारे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होवून काम सुरू होईल.
- अॅड. हेमंत गायकवाड, सरपंच, वाघळवाडी