पुणे : शहरात एकीकडे टोळ्यांच्या मुसक्या अवळल्या जात असताना दुसरीकडे पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवर मध्यरात्री घडली. गुन्हे शाखेतील एका पोलिस कर्मचार्यावर कोयत्याने वार केल्याचा हा प्रकार घडला असून याप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अमोल काटकर असे गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. काटकर हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये नियुक्तीस आहेत. मध्यरात्री एकच्या सुमारास ते कामावरून घरी निघाले होते. विधी महाविद्यालय रस्त्याने दुचाकीस्वार काटकर निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण निघाले होते. दुचाकीला हुल दिल्याने दुचाकीस्वार आरोपींना पोलिस कर्मचारी काटकर यांनी विचारणा केली. त्या वेळी झालेल्या वादातून दुचाकीवरील आरोपींनी काटकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.
या घटनेत काटकर जखमी झाले. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या काटकर यांना तातडीने डेक्कन जिमखाना भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पसार झालेला दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. शहरात पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.