

पुणे: पूर्ववैमनस्यातून धनकवडी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
करण रामचंद्र शिवतरे (रा. तापकीर चौक, शेलार चाळीजवळ, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. शिवतरे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संदेश अरुण नायर (वय 20,रा. बालाजीनगर), देवस्य ऊर्फ नानू राजेश सावंत (वय 19,रा. धनकवडी), शरद ऊर्फ सुमीत अरुण फाळके (वय 20, रा. बालाजीनगर) यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत करणचे वडील रामचंद्र शिवतरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा करण शिवतरे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धनकवडीत मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी करणला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन संदेश, देवस्य आणि शरद या तिघांना अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.