पुणे: शहरामध्ये चोवीस तासांत खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत, तर दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला आहे. कासेवाडीत मुलीने आपल्या बापाच्या छातीत चाकू मारून खून केला, तर तिकडे वडगाव बुद्रुक परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा खून झाला आहे. तसेच दत्तनगर चौक येथे तिघांनी एका रिक्षाचालकावर धारधार शस्त्राने वार केले. कोथरूड येथील गोपीनाथनगर परिसरात टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला केला.
साहिल कांबळे ( वय 19, रा. कोथरूड) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजता टोळक्याने साहिलला गोपीनाथनगर येथे गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. साहिलच्या हातावर, डोक्यात गंभीर जखमा आहेत. माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साहिल रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. पोलिस आणि नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. साहिलवर हल्ला करणारे आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या वादातून तिघांनी एका रिक्षाचालकावर धारधार शस्त्राने हल्ला केला. सोमवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास कात्रज चौक ते नवले बिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक येथे ही घटना घडली. आरोपींच्या हल्ल्यात सूरज माणिक काळे (वय 30, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज) हा रिक्षाचालक जखमी झाला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी पॅसेंजर भरण्याच्या कारणातून त्यांच्यात वाद झाले होते. याप्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. बापूसोा बाळासाहेब भोसले ( वय 35, रा. जुनी दुगड चाळ, कात्रज), गणेश हरिभाऊ धारपाले (वय 27 रा. गोकुळनगर, कात्रज), गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय 36, रा. सर्वे नंबर 16, हरी कृपा बिल्डिंग, तिसरा मजला, आंबेगाव पठार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चाकूने वार करून मुलीने केला वडिलांचा खून
दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणातून मुलीने आपल्या वडिलांचा चाकूने छातीत वार करून खून केला. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय 70, रा. काशीवाडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय 40, रा. पोलिस चौकीसमोर, काशीवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीसमोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री 11 वाजता घडला. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळे राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारू पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करू लागले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशादने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तोपर्यंत अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.