पुणे

Pune Crime News : पोलिसांनी सांगूनही त्यांनी ऐकले नाही!

Laxman Dhenge

पुणे : पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने जाळ्यात खेचून टास्क फ्रॉडद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांना गंडा घातला. पोलिसात धाव घेत त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना परत सायबर चोरट्यांच्या कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे सांगितले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. गेलेले पैसे परत मिळतील म्हणून सायबर चोरट्यांच्या मेसेजला प्रतिसाद दिला अन् परत पैसे गमावून बसले. शहरातील पाच उच्चशिक्षित व्यक्तींना सायबर चोरट्यांनी दुसर्‍यांदा आपल्या जाळ्यात खेचून आर्थिक गंडा घातला आहे. त्याचं झालं असं… पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क केला.

त्यानंतर पेड टास्क देऊन त्यांना लाखो रुपयांना गंडवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना परत सायबर चोरट्यांच्या कोणत्याही मेसेजला प्रतिसाद न देता आर्थिक व्यवहार न करण्यास सांगितले. काही दिवसानंतर परत सायबर चोरट्यांनी या तक्रारदारांसोबत संपर्क करून तुमचे गेलेले पैसे परत मिळतील म्हणून प्रलोभन दाखवले अन् तेथेच ते फसले. त्यांनी परत सायबर चोरट्यांच्या खात्यावर पैसे भरले; परंतु त्यानंतर त्यांना ना अगोदर गेलेले पैसे मिळाले, ना दुसर्‍यांदा दिलेले.

पुन्हा त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दुसर्‍यांदा तक्रार दिली. एका अभियंत्याने जून महिन्यात टास्कच्या आमिषाने 64 लाख रुपये गमविले होते. आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच यानंतर सायबर /इचोरट्याने त्याला परत मेसेज करून पैसे परत मिळतील, मेसेज करून पुन्हा एकदा 11 लाख रुपये गमावले आहेत./इ याच बरोबर हडपसर भागात राहणार्‍या अभियंत्याने ऑगस्ट महिन्यात टास्कमुळे 32 लाख रुपये गमावले होते. यानंतर परत सायबर चोरट्याने फसवत 6 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे. इतर तीन जणांनीसुद्धा अशीच तक्रार केली आहे.

मार्च महिन्यापासून आतापर्यंत सायबर पोलिसांकडे टास्क फ्रॉड संदर्भात 279 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये तब्बल 28 कोटी 24 लाख 83 हजार रुपये पुणेकरांनी गमावले आहेत. सायबर आणि स्थानिक पोलिस ठाण्यांत याबाबत 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार किती मोठ्या प्रमाणात वाढतोय, हे दिसून येते.

असे टाकतात जाळे…

  • तुम्हाला जाळ्यात खेचण्यासाठी सायबर चोरटे प्रथम आर्थिक प्रलोभन दाखवतात.
  • थोड्याशा पैशाला आपण बळी पडतो आणि अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतो.
  • सुरुवातीला हे चोरटे आपल्याकडून थोडे-थोडे पैसे त्यांच्या खात्यावर भरून घेतात.
  • त्या वेळी आपल्याला कसा आकर्षक परतावा मिळणार आहे हे सांगतात.
  • मग काय, आपण हजारापासून ते लाखोंपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर पाठवून देतो.
  • जेव्हा आपल्याला कळते की, आपली फसवणूक होतेय, तोपर्यंत मात्र वेळ गेलेली असते.
  • शेवटी आपल्याला वाटते, आता चार लाख भरले आहेत.., तर समोरील व्यक्ती म्हणते आणखी पन्नास, साठ, ऐंशी हजार भरा, तुमचे पैसे परत मिळतील.
  • आपण थोडे-थोडे करून मोठी रक्कम त्यांच्या खात्यावर भरतो आणि कंगाल होतो.
  • त्यामुळे वेळीच सावध व्हा, एकदा फसवणूक झाली तर पुढे पैसे भरू नका. पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.

सायबर चोरट्यांनी पहिल्यांदा फसविल्यानंतरसुद्धा हे पाच जण पुन्हा एकदा फसले आहेत. तक्रारदार जेव्हा तक्रार घेऊन येतात, तेव्हा सायबर चोरट्यांशी संपर्क करू नये अशा सूचना देण्यात येतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करून हे लोक पैसे गमवात आहेत. सायबर चोरट्यांनी परत पैसे मिळतील, असे सांगून फसवणूक केली आहे.

– मीनल सुपे पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT