पणजी : दोन कारच्या अपघातात हैदराबादच्या ३ पर्यटकांचा मृत्‍यू | पुढारी

पणजी : दोन कारच्या अपघातात हैदराबादच्या ३ पर्यटकांचा मृत्‍यू

हणजूण ; पुढारी वृत्तसेवा हडफडे, बार्देश येथे झालेल्या दोन कारच्या अपघातात हैदराबादचे तिघे पर्यटक जागीच ठार झाले. हा अपघात येथील रशियन क्लब जवळ पहाटे 3.30 वाजण्याच्या दरम्यान घडला.

या विषयी अधिक माहिती अशी की, हैदराबाद येथून आलेले पाच मित्र हडफडे येथील रेस्टॉरंट मध्ये गेले होते. रेस्टॉरंट मधून TS06EZ1816 या कार मध्ये बसण्यासाठी जात असताना मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या GA 03Z 8001 या क्रमांकाच्या पोलोकारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, त्या कारमधील तिघे पर्यटक जागीच ठार झाले, तर दोघे किरकोळ जखमी झाले. 1) महेश शर्मा, नाशिक, महाराष्ट्र, 2) दिलीप कुमार बंग, हैदराबाद, 3) मनोज कुमार सोनी, अशी या अपघातात मृत्‍यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. धडक देणारी पोलो कार अँटोन बायकोव (27, रशिया ) हा विदेशी पर्यटक चालवत होता. तोही या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताचा पंचनामा हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक साहिल वारंग आणि हवालदार रूपेश शेटगावकर यांनी केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकोत पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button