विळखा मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा! | पुढारी

विळखा मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा!

डॉ. अनिल मडके

गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा चीनमधून श्वसनविकाराच्या विशेषत: न्यूमोनियाच्या साथीच्या बातम्या येत आहेत. चीनमधील बिजिंग आणि लियाओनिंग या भागात लहान मुलांमध्ये प्रचंड वेगात न्यूमोनिया पसरत आहे. तीव्र प्रकारच्या या न्यूमोनियाचे दररोज किमान 7 हजार रुग्ण सापडत आहेत आणि लहान मुलांची हॉस्पिटल्स न्यूमोनियामुळे तुडुंब भरले आहेत. या न्यूमोनियाच्या उद्रेकामुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली. न्यूमोनिया संसर्गाची परिस्थिती अजूनही पूर्ण आटोक्यात नसल्याने कोव्हिड 19 च्या भयप्रद स्मृती सर्वांच्या मनात तरळून जात आहेत.

सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या या न्यूमोनियाचे कारण मायकोप्लाझ्मा नावाचा जीवाणू असल्याचे दिसून आले आहे.
या न्यूमोनियाला मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया किंवा फिरता न्यूमोनिया (थरश्रज्ञळपस झपर्शीोपळर) असे म्हणतात.
मायकोप्लाझ्मा नावाचा जीवाणूवर्ग हा जीवाणूंपैकी एक अत्यंत सूक्ष्म जीवाणू. या वर्गातील 200 जीवाणूंपैकी ‘मायककोप्लाझ्मा न्यूमोनि’ नावाचा जीवाणू हा माणसांमधील न्यूमोनियासाठी कारणीभूत असतो.

प्रसार कसा होतो ?

हा जीवाणू सर्दी-खोकला- शिंकणे अशा क्रियांमधून जे तुषार/ कण बाहेर पडतात, त्याद्वारे पसरतो. त्यामुळे जेव्हा एखादी निरोगी व्यक्ती मायकोप्लाझ्मा संसर्गित व्यक्तीच्या निकट सानिध्यात येते, तेव्हा याचा संसर्ग होऊ शकतो. अशा व्यक्तीने हाताळलेल्या वस्तूंवर हे जीवाणू काही काळ वास्तव्य करतात . त्यांना फोमाईट्स असे म्हणतात . त्यामुळे रुग्णाने हाताळलेल्या वस्तूंना निरोगी व्यक्तीने हात लावला आणि तो हात नाकाजवळ नेला, तरीही संसर्ग होऊ शकतो.
नाकावाटे हा जिवाणू घशात येतो आणि तिथून तो श्वसनमार्गात प्रवेश करतो. श्वसनमार्गाच्या अस्तरातील पेशींवर हा हल्ला करतो आणि या

पेशींना कमकुवत करतो. श्वसनमार्गाच्या बाहेरच्या जंतूंपासून किंवा कणांपासून संरक्षण करणे आणि श्वसनमार्गातील स्रावांचे प्रमाण नीट ठेवणे, हे या अस्तरातल्या पेशींचे काम असते. संसर्गामुळे या कामावर परिणाम होतो. या जीवाणूमुळे फुफ्फुसातील वायूकोशांवर परिणाम होऊन त्या घट्ट होतात. त्याला न्यूमोनिया असे म्हणतात. न्यूमोनियामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड च्या देवाणघेवाणीवर परिणाम होतो आणि रुग्णाला खोकला येतो व धाप लागते.

लक्षणे

सर्दी, पडसे, घसा दुखणे, घसा खवखवणे , आणि हळूहळू वाढणारा आणि काही आठवडे टिकणारा खोकला, प्रचंड थकवा येणे, भूक मंदावणे अशी काहीशी लक्षणे यामध्ये असतात. श्वसनमार्गाला दाह होतो आणि श्वसनमार्गाच्या भिंती जाडसर होतात. संसर्ग आटोक्यात आला नाही, तर न्यूमोनिया होतो.

निदान

‘मायकोप्लाझ्मा न्यूमोनि’ या जीवाणूच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे थुंकी तपासून याचे सहज निदान होत नाही. यासाठी पीसीआर नावाची चाचणी करून निदान पक्के करावे लागते. छातीचा एक्स-रे आणि सिटीस्कॅन यावरून न्यूमोनियाचे प्रमाण आणि तीव्रता समजते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळत असल्याने , सजग राहून तातडीने निदान करणे आवश्यक असते. प्रौढ व्यक्तींमधील दमा – सीओपीडी – आय एल डी सारखे श्वसनविकार किंवा मधुमेह, कर्करोग , संधिवातासारखे इतर दीर्घकालीन विकार यामुळे उद्भवणार्‍या लक्षणांबाबत जागृत राहावे लागते.

धोका

मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा वेळीच आटोक्यात आणला गेला नाही तर, तो फुफ्फुसांच्या बाहेर पसरू शकतो हे याचे वैशिष्ट्य आहे. या जीवाणूमुळे मेंदूला किंवा मेंदूच्या आवरणाला दाह होणे (इनसेफेलाइटिस – मेनिंजायटीस), गुलेन बारी सिंड्रोम हा तीव्र मज्जातंतू दाह, हिमोलायटिक निमिया प्रकारचा रक्तक्षय, कावीळ , हृदयाच्या आवरणात पाणी होणे, त्वचा विकार असे विकार उद्भवू शकतात. म्हणून या न्यूमोनिया विषयी जागरूक राहावे.

उपचार

मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचे वेळीच निदान करून त्यावर योग्य ती प्रतिजैविके तातडीने देणे महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, महत्त्वाचे असते.
फॅमिली डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन देखील सर्दी, खोकला, घसा दुखणे थांबत नसेल तर, योग्य त्या चाचण्या करून घेणे महत्त्वाचे.

प्रतिबंध

मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा जीवाणू हा निकट संपर्कातून पसरत असल्यामुळे गर्दीची ठिकाणी टाळणे महत्त्वाचे. शाळा, वज्तिगृहे, मंडई, बसस्टॉप, लोकल किंवा रेल्वेतून प्रवास एसी बस मधून प्रवास, समारंभ, जत्रा किंवा कोणत्याही कारणाने झालेली दाटीवाटी आणि तिथे मास्क शिवाय व्यतीत केलेल्या वेळावर मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा संसर्ग अवलंबून असतो. म्हणून अशी गर्दीची ठिकाणे टाळणे महत्त्वाचे आणि आजही सोशल डिस्टन्सिग, मास्कचा वापर आणि अनोळखी ठिकाणी स्पर्श केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर विशेषत: अशा साथीच्या काळात बाहेर गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर कटाक्षाने पाळणे महत्त्वाचे ठरते आणि अर्थात आपली रोगप्रतिकारक्षमता ही बारा महिने चोवीस तास उत्तमच ठेवणे हे आपल्या हातात असते. यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, ताण-तणावरहित जीवनशैली आणि आता प्रदूषणरहित वातावरण या पंचसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा.

Back to top button