पुणे

Pune Crime News : येरवडा कारागृहात कैद्याचा खून : चार कैद्यांविरुद्ध गुन्हा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी दुपारी एका न्यायाधीन कैद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चौघा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे येरवडा कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच एका बंद्याने नाडीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

महेश महादेव चंदनशिवे ( रा. चिखली, पुणे ) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणी न्यायाधीन बंदी असलेले अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी भुरे, गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम येरवडा पोलिस ठाण्यात सुरू होते. दरम्यान चंदनशिवे याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यावर तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनशिवे याचेविरुध्द पिंपरी पोलिस ठाण्यात दरोड्याची तयारी आणि आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तो 30 नोव्हेंबर 2022 पासून कारागृहात दाखल होता. गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सर्कल नंबर 2 मधील बराक नंबर एकमध्ये आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर हजाम कामासाठी वापरण्यात येणारी कैची आणि दरवाजाच्या बीजागरीच्या तुकड्याने मानेवर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी चंदनशिवेला कारागृहातील रक्षकांनी तातडीने कारागृह रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार करून ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT