पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुन्हेगारी टोळ्यांमध्ये कोयत्याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येत असताना आता त्याचा वापर कौटुंबिक वादात होऊ लागल्याचे पुण्यातील एका घटनेवरून समोर आले आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. त्यानंतर किचनमधील लोखंडी खलबत्ता डोक्यात घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमध्ये 20 वर्षीय पत्नी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती संजय कारभारी शिंदे (वय 33, वडगाव शेरी) याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत वडगावशेरी येथील राहत्या घरी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपीचे 9 जुलै रोजी नुकतेच लग्न झालेले आहे. त्यानंतर पत्नी ही सासरी नांदत असताना, पतीने तिला 'तुझ्या आई-वडिलांनी माझ्या लग्नात खर्च केला नाही, तू तुझ्या माहेरकडून 30 लाख रुपये घेऊन ये 'असे वारंवार बोलून तसेच तिच्यासोबत काढलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
दरम्यान, आरोपीने 21 ऑक्टोबर रोजी रात्री पीडित महिला तिच्या नंणदेच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून घरी जात असताना, आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी कोयता तिच्या डोक्यात मारला. तसेच किचनमधील लोखंडी खलबत्ता डोक्यात मागील बाजूस मारून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी महिलेचे वडील यांना याबाबत माहिती झाल्यावर त्यांना घटनेनंतर बोलावून घेतले असता, त्यांनासुद्धा आरोपीने धारदार हत्याराने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, चंदननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. घोरपडे तपास करीत आहेत.
हेही वाचा