पुणे: अनैतिक संबंधांतून महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात उघडकीस आली आहे. मनीषा खम्म दमाई (वय 25, सध्या रा. आयुषी कॉम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी, आंबेगाव पोलिसांनी आरोपी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय 30, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक केली आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय 35, सध्या रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ ) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळील वाडा हॉटेलच्या मागील बाजूला जंगलामध्ये 18 ते 28 मार्च 2026 दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तिखात्री, मनीषा दमाई आणि किशन परिहार हे मूळचे नेपाळचे राहणारे असून, पुण्यात रखवालदाराचे काम करतात. मनीषा दमाई ही किशन परिहार यांची बहीण आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. प्रकाश आणि मनीषा दोघे विवाहित असून, त्यांना मुले आहेत. या दोघांत अनैतिक संबंध होते.
मात्र, प्रकाश याला आता हे संबंध नको होते. मनीषा काही केल्याने त्याला सोडायला तयार नव्हती. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. प्रकाशला आपली सुटका करून घ्यायची होती. त्यातूनच 18 मार्च रोजी प्रकाश मनीषाला घेऊन भिलारवाडीच्या जंगलात गेला. तेथे त्याने तिचा दोरीने गळा आवळून खून केला. मनीषाचे नातेवाईक ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी नऱ्हे पोलिस ठाण्यात गेले होते. हा प्रकार आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे पाठविले.
चौकशीत प्रकाश याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने मनीषाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रकाशला घेऊन भिलारवाडीचे जंगल गाठले. त्याने घटनास्थळ दाखविले. किशन याने मनीषा हिचा मृतदेह ओळखला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.