खेड : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे ३३ वर्षीय भीमा बबन रेणके याने रविवारी (दि. २४) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरात झाडाला गळफास घेऊन जीव संपविले. यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आणि व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या माहितीत पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे आणि प्रियकराकडून मिळालेल्या धमक्यांमुळे हे पाऊल उचलल्याचा उल्लेख आहे.
याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खेड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा रेणके याने राक्षेवाडी परिसरात गळफास घेऊन जीव संपविले. खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली; मात्र, भीमाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, भीमा याच्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या तरुणाकडून भीमाला सतत धमक्या मिळत होत्या. याबाबत भीमाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही, ज्यामुळे निराश होऊन त्याने जीवन संपविले.
भीमाने जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. ही चिठ्ठी त्याने व्हॉट्सॲपवर शेअर केली होती, जी पाहून नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत भीमाने जीवन संपविले होते.