पुणे: मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून घटस्फोटित महिलेशी ओळख करून घेतली. तिच्यासोबत लग्नाचे नाटक करीत 10 लाखांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटस्फोटित तसेच एकल महिलांना हेरून त्यांच्यासोबत लग्न करून त्यांना फसविण्याचे उद्योग हा आरोपी करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत 44 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन जगताप (वय 45, रा. रावेत) नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला कोथरूड येथे राहण्यास आहे. याआधी त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या आधी त्यांचा व्यवसाय होता. नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपीसोबत त्यांची मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर ओळख झाली.
आरोपीने त्यांना लग्नाचे प्रलोभन दाखविले. त्यानंतर मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत आरोपीने महिलेसोबत लग्न देखील केले. मात्र, आरोपीने महिलेला त्याच्या घरी नेले नाही. लग्नानंतर महिला तिच्या माहेरीच राहत होती.
दरम्यान, आरोपीने कोकणातील श्रीवर्धन येथे त्याच्या रिसॉर्टचे बांधकाम सुरू आहे, अशी बतावणी केली. त्यासाठी आर्थिक अडचण येत आहे, असे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिचे क्रेडिट कार्ड घेतले.
त्या क्रेडिट कार्डवरून त्याने तब्बल 10 लाख 10 हजार रुपये खर्च केले. दरम्यान, आरोपीने आपल्याशी खोटे लग्न केले असून, त्याने आपली आर्थिक फसवणूक केली आहे, ही गोष्ट लक्षात आल्यावर महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.