

पुणे: कोरोना काळात ऑनलाइन कराटे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींचा फिटनेस चेकिंगच्या बहाण्याने विनयभंग करणार्या शंकर हनुमंत मालुसरे (वय 44, रा. गणराज अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) या कराटे शिक्षकाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 42 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोक्सोच्या विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेपैकी 40 हजार रुपये प्रत्येक पीडितेला विभागून देण्यात यावेत तसेच 2 हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात यावेत. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी 17 वर्षीय पीडित विद्यार्थिनीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 8 ते 13 जून 2020 दरम्यान ही घटना घडली. मालुसरे हा कराटे शिक्षक आहे, तर फिर्यादी ही त्याची विद्यार्थिनी आहे. 9 जूनच्या दिवशी कराटेचे प्रात्यक्षिक समजून घेण्यासाठी पीडितेला घरी बोलाविले. क्लास संपल्यानंतर पीडिता घरी जात असताना आरोपीने अंगावर फक्त अंतरवस्त्र ठेवत पीडितेस फिटनेस चेक करण्यास सांगितले.
त्यानंतर दुसर्या दिवशी फिर्यादी घरी जात असतानाही त्याने जबरदस्तीने हाच प्रकार केला. त्यानंतर पीडितेचे फिटनेस चेक करण्याच्या बहाण्याने कपडे काढून विनयभंग केल्याची घटना घडली. याखेरीज त्याने पत्नी घरी नसताना अन्य विद्यार्थिनींना घरी बोलावून मसाजच्या बहाण्याने विनयभंग केल्याची फिर्याद विद्यार्थिनींनी पोलिस ठाण्यात दिली.
या प्रकरणात मालुसरेविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करीत त्याच्यविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी व इतर तीन पीडितांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. कोंघे यांनी केली. या प्रकरणात बचावपक्षातर्फे अॅड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले.
आरोपीच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याच्या क्लासमधील विद्यार्थिनींना हाताशी धरून आरोपीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली.
गुन्हा दाखल होताच तीन विद्यार्थिनींचीही तक्रार
या प्रकरणात 17 वर्ष 364 दिवसांच्या पीडितेच्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजल्यानंतर अन्य तीन विद्यार्थिनींनी तपासी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत झालेली घटना कथन केली. या वेळी आरोपी 2018 पासून हा प्रकार करीत असल्याचे समोर आल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करीत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.