

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व मेसेज जप्त करण्यात आले आहेत. चव्हाणने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी अपप्रेरणा तसेच चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहायक सरकारी वकील नितीन अडागळे यांनी न्यायालयाला दिली.
याखेरीज चव्हाण याच्या ताब्यातून वैष्णवी यांची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत असल्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयाला सांगितले. (Latest Pune News)
आरोपी नीलेश चव्हाण याच्यासह हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र हगवणे (वय 63), दीर सुशील हगवणे (वय 27) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सर्वांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या वेळी न्यायालयाने चव्हाण याला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर हगवणे पिता-पुत्राला पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत 16 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, पती शशांक हगवणे (वय 27), सासू लता राजेंद्र हगवणे (वय 54), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय 31) यांना न्यायालयाने यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या मुद्द्यांआधारे होणार पुढील तपास
वैष्णवीचे बाळ ताब्यात असताना चव्हाणने बाळाशी कोणत्या प्रकारची गैरवर्तणूक केली आहे का? त्याने कोणत्या कारणांसाठी अनधिकृतपणे बाळाचा ताबा घेतला होता? नीलेश आणि इतर आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले? चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्य यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यातून हा गुन्हा करण्यात आला आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे चव्हाणच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, तर राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला.