पुणे: नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.
खून प्रकरणातील साक्षीदार हा या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती. १७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली होती.
पोलिसांनी अशोकची चौकशी केली असता, अजयचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोकला मिळाल्यानंतर त्याने अजयचा खून केल्याचे प्रथम समोर आले. त्यानुसार अशोकला अटक केली. अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी साथादीर कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय २१), सचिनकुमार शंकर पासवान (वय २६) तसेच खुनातील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय ३०) यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. तसेच या गुन्ह्यात तोही सहभागी असल्याचे समोर आले. त्यावरून या चौघांचा शोध घेतला असता, ते पुणे रेल्वेस्थानकातून रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याचे समजले.
पोलिसांनी तत्काळ कृष्णकुमार, सचिनकुमार, रणजितकुमार यांना अटक केली. तिघेही मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. ते कात्रजमधील साईनगर परिसरात बांधकाम साईटवर मजुरी करत होते. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याने अशोक चिडला होता. त्याने चुलतभाऊ अजयचा खून करण्यासाठी आरोपींना ४ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी अजयकुमारचा खून करून मृतदेह गुजर निंबाळकरवाडीतील डोंगरात पोत्यात भरून फेकला होता. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.
ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक स्वप्निल पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, नवनाथ भोसले, सागर बोरगे, महेश बारावकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नीलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, सोनाली पिलणे यांनी केली.