सराफांना ठगवणारी टोळी जेरबंद; तिघांना गुन्हे शाखेकडून बेड्या  Pudhari
पुणे

Pune crime news: सराफांना ठगवणारी टोळी जेरबंद; तिघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

मुंबईच्या दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करीत तिघांना गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काळेपडळ, चंदननगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा छडा लावत तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपये किमतीचे मोबाईल, चार लाख रुपये किमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने, असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहित संजय गोरे (वय 30, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय 28), ओम सुंदर खरात (वय 23, रा. दोघे वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर त्यांना बनावट सोन्याचे दागिने पुरविणार्‍या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)

युनिट-6 च्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, बाळासाहेब सकटे हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी मुंढे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शहरातील सराफ व्यावसायिकांना सोन्याचे बनावट दागिने गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या टोळीतील काही लोक खांदवेनगर-वाघोली परिसरात फिरत आहेत.

त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फसवणूक केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

टोळीच्या मनसुब्यावर पाणी

आरोपींचा असा समज होता की, जरी काही दिवसांनंतर सराफ व्यावसायिकांना हे दागिने बनावट असल्याचे समजले तरी ते पोलिसात तक्रार करणार नाहीत. त्यामुळे टोळी बिनधास्त अतिशय सफाईदारपणे फसवणुकीचे जाळे विणत चालली होती. परंतु आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच सराफ व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांना बनावट दागिन्यांवर ट्रेडमार्क आणि हॉलमार्क आढळून आल्याने मुंबईच्या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

अशी होती ‘मोडस ऑपरेंडी’

आरोपी रोहित गोरे हा टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिस सांगतात. तिघे आरोपी मुंबई येथील दोघांकडून बनावट सोन्याचे दागिने पुण्यात आणत होते. परंतु, हे दागिने शंभर टक्के बनावट नसत. थोडक्यात त्याला काही प्रमाणात सोन्याचा टच असे. एवढेच काय तर त्याला ट्रेडमार्क आणि हॉलमार्कदेखील असे. त्यामुळे सराफ व्यावसायिक त्याला फसत असत. आरोपी आपल्याकडील दागिने गहाण ठेवून पैसे घेत होते; परंतु जेव्हा सराफ व्यावसायिक त्याचा टच काढून मोड करीत तेव्हा त्यांना ते बनावट असल्याचे लक्षात येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT