Vyankoji Khopade Pudhari
पुणे

Vyankoji Khopade Political Journey: कुस्तीपासून नगरसेवकपदापर्यंतचा प्रवास — व्यंकोजी खोपडे

प्रभाग ३८ मधून दणदणीत विजय; पाणी, रस्ते, उद्याने व पर्यटन विकासावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तरुणपणी नेमके काय व्हायचे, हे स्पष्ट ठरले नव्हते. त्यामुळे मी कुस्तीच्या क्षेत्राकडे वळलो. कोल्हापूरला तालमीत दाखल झालो. पुण्यात आल्यानंतरही कुस्तीचे धडे सुरू ठेवले. याच काळात राजकारणाची ओढ निर्माण झाली. विरोधकांना नमवून आधी सरपंच झालो. माझे गाव महापालिकेत आले तेव्हा महापालिका निवडणूक लढायची ठरविले होते. मला भाजपने तिकीट दिले. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत मी विजयी झालो. आता प्रभागात विकासकामे करायची आहेत, असा संकल्प नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी बोलून दाखविला.

व्यंकोजी खोपडे हे प्रभाग क्रमांक 38 बालाजी आंबेगाव-कात्रज मतदारसंघातून ‌‘इ‌’ गटातून निवडून आले आहेत. पाच सदस्यांचा हा शहरातील एकमेव प्रभाग आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत खोपडे यांनी 21 हजार 878 मते मिळवत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वसंत मोरे यांचा पराभव केला. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगताना खोपडे म्हणाले, माझे मूळ गाव गुजर निंबाळकरवाडी. येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर भारती विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत प्रवेश घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पदवी शिक्षणानंतर तालमीकडे वळून कुस्तीचे धडे घेतले. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. काही कारणांमुळे तालीम सोडावी लागल्यानंतर घरचा दूध व्यवसाय व शेती सांभाळली. पुढे स्वतःचा व्यवसायही सुरू केला. माझे चुलत बंधू गोरख खोपडे यांचे भारती विद्यापीठ-कात्रज परिसरात मोठे समाजकार्य होते. त्यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ ‌‘गोरख खोपडे फाउंडेशन‌’ची स्थापना करून समाजकार्य सुरू ठेवले.

खोपडे म्हणाले, मी सुरुवातीला पंचायत समितीची निवडणूक लढवली; मात्र अपयश आले. गुजर निंबाळकरवाडी हे छोटे गाव असून, त्याची फारशी ओळख नव्हती. मात्र, हे गाव राजकीय पटलावर यावे, हे ध्येय मनाशी बाळगून समाजकार्याला सुरुवात केली. यातूनच मी राज्यातील पहिला लोकनियुक्त पुरुष सरपंच झालो. त्यानंतर मी नगरसेवकपदाची तयारी केली आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आलो.

प्रभागात करणार ‌‘ही‌’ कामे

  • पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डोंगर

  • माथ्यावर टाकी उभारणार.

  • चांगली उद्याने व तलाव उभारून मूलभूत सुविधा विकसित करणार.

  • ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे करणार.

  • समाविष्ट गावांचा विकास आराखडा तातडीने तयार करून घेणार.

  • कात्रज चौक ते शिडनेवाडी रस्तारुंदीकरण करणार.

  • कात्रज घाटात छत्रपती शिवरायांचे शौर्य दर्शविणारे शौर्य स्मारक उभारणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT