

Pune Zp Election 2026 Kendur Panchayat Samiti Suchitra Thite
केंदुर: पाबळ, केंदूर परिसराला वरदान ठरलेले थिटेवाडी धरण ही निर्मिती ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची आहे तर आपल्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे याची तळमळ असणाऱ्या माजी मंत्री बापूसाहेब थिटे यांची दूरदृष्टी आहे असे मत केंदूर पंचायत समिती गणा च्या उमेदवार सुचिता थिटे यांनी केंदूर येथे व्यक्त केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या बोलत होत्या.
केंदुर पाबळ भागाला पाणी मिळावे अशी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री बापूसाहेब थिटे यांची तळमळ होती. परंतु काही कारणांमुळे ते रेंगाळले होते. याबाबत आमचे मार्गदर्शक परमेश्वर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाबळ येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने या धरणाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला.
सुरुवातीला थिटेवाडी हा प्रकल्प बंधारा म्हणून मोडत होता. त्यामुळे विस्थापित शेतकऱ्यांना जमिनी मिळणे अथवा नुकसान भरपाई याची कुठेही तरतूद नव्हती. बापूसाहेब थिटे यांनी याबाबत पुढाकार घेऊन पुनर्वसनाच्या तरतूद करून घेतली. यामुळे थिटेवाडी पाबळ येथील चौधरी वस्ती फुलेनगर आगरवाडी येथील शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या. तर फुलेनगर येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रफुल्ल शिवले यांनी थिटेवाडी संदर्भातील अजित पवार यांच्या विषयी भावना जागवली. ते म्हणाले की धरणाचे आंदोलन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
याच्या दुसऱ्या दिवशीच अजित पवार पहाटे साडेपाच वाजताच पाबळ येथे दाखल झाले होते. इतक्या सकाळीच दादा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांची धावपळ झाली होती. यातूनच आपल्याला दिसते की दादा हा कामाचा माणूस होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचे काम करणारा पक्ष आहे यामुळे सर्वांनी या पक्षाच्या पाठीमागे राहिला हवे असे शिवले यांनी यावेळी सांगितले.