पुणे: सौर पॅनल, गांडुळ खत व रेन वॉटर हार्वेस्टींग यांसारखे पर्यावरणीय प्रकल्प राबवून महापालिकेच्या मिळकतकर सवलत घेणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या आता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. ज्या सोसायट्यांनी अशा पर्यावरणीय प्रकल्प चालू असल्याचे दाखवून करात सवलत घेतली आहे. अशा प्रकल्पांची तपासणी महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यात ज्यांचे प्रकल्प बंद आवस्थेत आढळतील त्यांच्याकडून दंडासह कराची रक्कम वसूल केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शहरामधील सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जा पॅनल, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्िंटग यांसारखे पर्यावरणपुरक प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाते. असे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते. शहरात नव्याने होणाऱ्या बहुतांश सोसायट्यांमध्ये अशा पर्यावरण पुरक प्रकल्प राबविले जात असून त्यापोटी मिळकतकराची सवलत घेतली जात असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मात्र, अनेक सोसायट्यांमधील हे पर्यावरणीय प्रकल्प देखभाल दुरुस्तीसह वेगवेगळ्या कारणांमुळे बंद पडलेले आहेत.असे असतानाही महापालिकेकडून तपासणी न करताच त्यांना मिळकतकरात सवलत दिली जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेची फसवणूक होत आहे. मात्र, या अशा प्रकरणांची आता मिळकतकर विभागानेच गंभीर दखल घेतली आहे.
त्यानुसार पर्यावरण प्रकल्पांसाठी ज्या सोसायट्यांनी मिळकतकरात सवलत घेतली आहे. अशा सर्व सोसायट्यांमधील प्रकल्पांची तपासणी करण्यासंबधीचा प्रस्ताव मिळकतकर विभागाने आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार करात सवलत घेणाऱ्या सोसायट्यांमधील प्रकल्प बंद अवस्थेत आढळ्यास त्यांच्याकडून सवलती पोटी दिलेली रक्कम आणि त्यांवर दंडात्मक रक्कमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख रवि पवार यांनी दिली.
2026-27 मधील मिळकत कर सवलतीची माहिती
सौर प्रकल्प 34 हजार 884 2 कोटी 2 लाख 34 हजार 439
गांडूळखत 47 हजार 874 1 कोटी 93 लाख 71 हजार 123
रेन वॉटर हार्वेस्िंटग 4 हजार 881 22 लाख 35 हजार 202
रेन वॉटर/गांडुळखत 10 हजार 947 82 लाख 58 हजार 105
सौर/गांडुळखत/रेन वॉटर 7 हजार 453 98 लाख 24 हजार 54
सौर/रेन वॉटर 9 हजार - 104 1 कोटी 17 लाख 8 हजार 776
सौर/गांडुळखत 49 हजार 763 5 कोटी 58 लाख 72 हजार 131
एकूण 1 लाख 64 हजार 906 12 कोटी 75 लाख 3 हजार 830