सुवर्णा चव्हाण
पुणे: “वाढत्या उकाड्यात काम करणं लई जड जातंय ताई... पण करणार तरी काय? पोटासाठी राबायलाच लागतंय. बायको- पोरांसाठी घाम गाळतोय. पाच वर्षांपूर्वी बांधकामावर मजुरीला लागलो. पण, या कामात म्हणावा तसा पैसा मिळत नाय. कधी काम मिळतं, कधी घरीच बसायची वेळ येते. उसनवारी करून संसार चालवावा लागतोय. पुण्यात घरभाडं बी लई महाग झालंय. तरी बी जगणं थांबवून कसं चालंल? उद्या कधीतरी दिवस पालटतील, सगळं बरं होईल, या आशेवरच रोज राबतोय...” अशा शब्दांत बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या सचिन (नाव बदलले आहे) यांनी आपल्या आयुष्याची व्यथा मांडली.
ही कहाणी फक्त सचिन यांची नाही, तर शहर उभारणाऱ्या हजारो बांधकाम मजुरांची आहे. सकाळी सातची वेळ... शहर अजून पूर्ण जागं व्हायचं असतं; पण बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची धावपळ सुरू झालेली असते. कुणाच्या डोक्यावर सिमेंटची घमेली, कुणाच्या हातात लोखंडी सळया, तर कुणी बांबूच्या आधारावर जीव मुठीत धरून उंच इमारतींवर काम करीत असतो. स्वतःच्या आयुष्याचा पाया मात्र अजूनही कच्चाच असताना हे मजूर शहरातील उंचच उंच इमारती उभ्या करीत आहेत.
पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात बांधकाम व्यवसाय तेजीत असला, तरी भर उन्हात राबणाऱ्या या मजुरांचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांना महिन्याच्या पगाराची, विम्याची किंवा सुरक्षित भविष्याची कोणतीही हमी नसते. ‘आज काम मिळालं तर चूल पेटते; नाहीतर उपाशी राहावं लागतं,’ अशी व्यथा अनेक मजूर व्यक्त करतात.
बांधकामाच्या ठिकाणी दिवसभर धूळ, सिमेंट आणि प्रचंड आवाजात काम करताना आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत. तरीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते वेदना लपवून काम करीत आहेत. अशाच काही बांधकाम मजुरांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याची कहाणी सांगितली.
अनेक वर्षांपासून बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे बाळू गोशी म्हणाले, ‘कधी काम मिळतं, तर कधी मिळत नाही. महिन्यात पंधरा दिवस काम असतं, तर उरलेले दिवस घरी बसून राहावं लागतं. इतकी बांधकामं सुरू असूनही कामाची कमतरता आहे. त्यामुळे काम मिळालं तरच चूल पेटते,’ अशी अनेकांची परिस्थिती आहे. ‘आमचं काम खूप अवघड आहे. प्रत्येकाला हे काम जमणार नाही.’
...या वयात भरउन्हात राबणं अवघड जातं!
“माझे वडील गवंडी काम करायचे. शिक्षण झालं नसल्याने बांधकामाच्या कामाला लागलो. आजही वयाच्या 58 व्या वर्षी काम करतोय. या कामानं कुटुंब उभं राहिलं. पण, आता परिस्थिती बदलली आहे. या वयात भर उन्हात राबणं अवघड जातं. बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट, धूळ आणि जिवालाही धोका असतो. तरी कुटुंबासाठी काम करावंच लागतं. आयुष्यात सुख-दुःख असतंच; पण आनंदी राहणं महत्त्वाचं आहे,” अशा शब्दांत अनंतराव काळे यांनी आपली कहाणी मांडली.
...ही आहे स्थलांतरित मजुरांची व्यथा
पुण्यात सिंहगड रस्ता, कोथरूड, कोंढवा, कात्रज, हिंजवडी अशा भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर भारतातून अनेक मजूर पुण्यात कामासाठी आले आहेत. तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहून ही माणसे शहर घडवत आहेत. महिलाही मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात काम करीत असून, डोक्यावर विटा-सिमेंट वाहत संसाराचा गाडा ओढत आहेत. या मजुरांच्या आयुष्यालाही सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा मजबूत पाया मिळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.