निनाद देशमुख
पुणे: स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि पर्यावरणपूरक विकासाचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचे वास्तव मात्र शहराच्या कानाकोपऱ्यात पडलेल्या बांधकाम राडारोड्यातून समोर येत आहे. शहरात दररोज सुमारे 300 टन बांधकामाचा राडारोडा तयार होत असून, त्यातील मोठा हिस्सा रस्त्यांच्या कडेला, नदीकाठावर, मोकळ्या जागांमध्ये आणि समाविष्ट झालेल्या गावांच्या परिसरात फेकला जात असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनीच दिली आहे.
हा सर्व कचरा अखेरीस महापालिकेलाच उचलावा लागत असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च नागरिकांच्या कराच्या पैशातून केला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या निवासी टॉवर्स, व्यावसायिक संकुले, रस्तेखोदाई आणि पुनर्बांधणी कामांतून मोठ्या प्रमाणावर सिमेंट, विटा, मुरूम, लोखंडी तुकडे आणि अन्य बांधकाम साहित्याचा राडारोडा निर्माण होतो. नियमांनुसार हा कचरा अधिकृत प्रक्रिया केंद्रात नेणे बंधनकारक असले, तरी प्रत्यक्षात अनेक बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार रात्रीच्या वेळी हा कचरा शहरातील मोकळ्या जागांमध्ये टाकत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेकडे या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, सीसीटीव्ही निरीक्षण, दंडात्मक कारवाई आणि तक्रारनिवारण प्रणाली असतानाही प्रत्यक्षात अत्यंत किरकोळ स्वरूपाची कारवाई झाल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांत करण्यात आलेल्या 1,170 कारवाईत अवघा 79 लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे. शहरात रोज निर्माण होणाऱ्या राडारोड्याच्या प्रमाणाच्या तुलनेत ही कारवाई अत्यंत तोकडी मानली जात आहे.
मोकळ्या जागाच बनल्या डम्पिंग ग््रााउंड
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील अनेक भाग अनधिकृत डम्पिंग पॉइंटमध्ये बदलले आहेत. रस्त्यांच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. सिंहगड रस्त्याला पर्यायी कालवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जातो. या कचऱ्यामुळे नाले तुंबणे, धूळप्रदूषण वाढणे आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये रोज जवळपास 300 टन बांधकाम कचरा तयार होतो. हा कचरा वाघोली येथे असलेल्या प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठविला जातो. या प्रकल्पाची क्षमता देखील 300 टन असल्याने रोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास अडचणी येत आहेत. गुजर निंबाळकरवाडी येथेही 250 टन क्षमतेचा नवा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, तो पूर्ण होण्यास आणखी वाट पाहावी लागणार आहे.
आयुक्तांच्या आदेशाला अधिकारी देईनात प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या शेजारील टिळक पुलाजवळ एका बांधकाम व्यावसायिकाने राडारोडा टाकला होता. यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करीत त्याचे काम देखील थांबविण्यात आले होते. त्यानंतर मात्र कोणावरही कारवाई झाली नाही.