निवडणूक... कालची, आजची
सुनील माळी
सूर्य चढत-चढत डोक्यावर येतो; पण माध्यान्हीपासून पुन्हा तो ढळायला लागतो. वर चढत जाणारा कुठेतरी उतरणार असतो, उत्कर्षापाठोपाठ पतन, यशापाठोपाठ अपयश येणारच असते...(Latest Pune News)
पुणे महापालिकेतील सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वभरारीचे म्हणजेच पर्यायाने काँग्रेसच्या यशाच्या चढत्या कमानीचे असेच झाले. काँग्रेसच्या एकछत्री कारभाराला तडा जायला सुरुवात झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० मे १९९९ रोजी झालेल्या स्थापनेनंतर. सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्या वेळी ते पुण्यात होते. ही काँग्रेसमधील उभी फूट होती. त्याचा थोडासा फटका पुणे महापालिकेच्या २००२ मधल्या निवडणूक निकालावर बसला; पण खरा फटका बसला तो २००७ च्या निवडणुकीत. त्या निवडणुकीत काँग्रेस थेट निम्म्यावर घसरली अन् काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जागा मिळविल्या. एकूण १४४ जागांपैकी राष्ट्रवादीला ४१, काँग्रेसला ३६, भारतीय जनता पक्षाला २५, शिवसेनेला २०, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ जागा होत्या. कोणत्याच पक्षाला स्वबळावर सत्तेवर येता येत नव्हते; पण राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ घेऊन सत्तेवर येणे सहजशक्य होते... पण... पण राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्याची सूत्रे सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी कलमाडी यांना सत्ताभ्रष्ट करण्याचा जणू पणच बांधला होता. त्यांनी भाजप, शिवसेनेला बरोबर घेत अभूतपूर्व युती केली, ती पुढे 'पुणे पॅटर्न' म्हणून गाजली.
.... त्यामुळे १९९२ पासून सत्तेच्या शिखरावर असलेल्या कलमाडी यांना २००७ मध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
महापालिकेची सत्ता गेली अन् त्यामुळे त्यांच्याभोवती असलेल्या नगरसेवकांची, कार्यकर्त्यांची झुंबडही एकदम आटली. ज्या कलमाडी हाऊसमध्ये उभे राहायला जागा नसायची, तिथे निकालाच्या दिवशी शुकशुकाट होता. विजयाच्या आशेने हाऊसच्या आवारात खुर्थ्यांची रांग मांडलेली होती, त्या रिकाम्या खुच्र्यांमध्ये एकटे कलमाडी उभे होते... आम्ही पत्रकार प्रतिक्रियेसाठी गेलो असताना दिसलेले ते चित्र कॅमेऱ्यातही बंद करून घेतले अन् दुसऱ्या दिवशी प्रसिद्धही केले...
.... अजित पवार यांच्या हाकेला ओ द्यायला भाजप आणि शिवसेना पक्ष तयारच होते. त्यांच्या ध्यानी-मनीही सत्तेची शक्यता नव्हती; पण आता सत्ता चालून आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना यांची युती झाली अन् त्या पुणे पॅटर्नने सत्ता या तीनही पक्षांमध्ये विभागली गेली. पहिली अडीच वर्षे महापौरपद राष्ट्रवादीकडे आणि नंतरची अडीच वर्षे भाजपकडे, अशी बोली झाली. त्यानुसार राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले महापौर, तर बापू पठारे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे उपमहापौर झाले. दुसऱ्या वर्षी शिवसेनेच्या श्याम देशपांडे यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. महापालिकेच्या इतिहासात ही पदे शिवसेनेला प्रथमच मिळत होती. तिसऱ्या वर्षी राष्ट्रवादीचे नीलेश निकम स्थायी समितीचे अध्यक्ष झाले; पण महापौरपद भाजपला देण्याआधीच पुणे पॅटर्न तुटला. अजित पवार-सुरेश कलमाडी यांचे पुन्हा मनोमिलन झाले आणि २०१२ च्या निवडणुकीपर्यंत हे दोन्ही पक्ष सत्तेत राहिले.
.... काँग्रेस अडीच वर्षांनी पुन्हा सत्तेत परतली आणि २०१२ च्या निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष सत्तेत आले, तरीही सत्तेतला प्रमुख वाटा हा राष्ट्रवादीचाच राहिला आणि एकेकाळी पूर्ण सत्ता असलेल्या तसेच 'हम करे सो कारभार' तत्त्वाची सवय झालेल्या काँग्रेसला दुय्यम स्थानच पत्करावे लागले....
कालाय तस्मै नमः