पुणे: शहराच्या मध्यवर्ती पूना हॉस्पिटलनजीक राहणाऱ्या एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (28) सकाळी उघडकीस आली.
आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सागर सुभाष पवार (वय 26. रा. मेहकर , बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा पूना हॉस्पिटलनजीक एका रूममध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. पहाटेच्या सुमारास राहत्या खोलीत तो मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.
सागरने स्पर्धा परीक्षचा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.