Pune Gas Shortage Pudhari
पुणे

Pune Commercial Gas Shortage: पुण्यात व्यावसायिक गॅस टंचाई; मेस-हॉटेल बंद, विद्यार्थ्यांचे हाल

स्पर्धा परीक्षार्थी अडचणीत; जेवणाचा प्रश्न गंभीर, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील हॉटेल्स तसेच मेसचालकांना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णत: बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलला टाळे लावले, तर काहींनी मेन्यूमध्ये बदल केला आहे. याचा गंभीर परिणाम स्पर्धा परीक्षार्थी तसेच विद्यार्थ्यांवर झाला असून, काही स्पर्धा परीक्षार्थींनी गावाकडे परत जाणे पसंत केले असल्याचे स्पर्धा परीक्षार्थींनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धा परीक्षार्थी तसेच विद्यार्थी साधारण महिनाभराचे पैसे एकदाच देऊन दोन्ही वेळचा डबा लावणे किंवा संबंधित हॉटेलमध्ये जेवण करण्याचा पर्याय स्वीकारतात. परंतु, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच मेसचालकांनी हॉटेलमध्ये मेनू कमी करणे किंवा ठराविक पदार्थ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे संबंधित स्पर्धा परीक्षार्थी तसेच विद्यार्थ्यांचे जेवणाचे प्रचंड हाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने खानावळींनी जेवणाचे दर वाढवले आहेत, जे सामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. महागाईमुळे एका डब्यात दोन विद्यार्थ्यांना जेवावे लागत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून गावी परत जात आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने तातडीने ‌‘सार्वजनिक पोळी-भाजी केंद्र‌’ सुरू करावीत. शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या खानावळींसाठी स्वस्त गॅस कोटा आरक्षित करावा. अन्यथा संतप्त विद्यार्थी कधीही रस्त्यावर उतरू शकतात.
नितीन आंधळे, विद्यार्थी प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षार्थी
शहरातील मेस आणि हॉटेल्स बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेला अन्नाचा प्रश्न खरोखरच चिंताजनक आहे. विद्यार्थी रूमवर इलेक्ट्रिक इंडक्शनवर खिचडी, वरण-भात बनवून दिवस ढकलत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे.
ॠषिकेश सांगळे, मेडिकल विद्यार्थी
युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका पुण्यातील विद्यार्थी मेस सेवांना बसला असून, अनेक भोजनालये बंद झाली आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे कठीण झाले असून, त्यांच्या आरोग्यावर व अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने गॅसपुरवठा तातडीने सुरळीत करावा किंवा पर्यायी भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
वैभव लोमटे, स्पर्धा परीक्षार्थी
सध्या गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक मेस बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मेस तसेच हातगाड्यांवर, स्टॉलवर जे मिळेल त्यावर दिवस काढावे लागत आहेत. काही विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील परीक्षा अजून बाकी आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी देखील अडकून पडले आहेत. मेस बंद असल्यामुळे जास्तीचा खर्च करावा लागत असून, तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाही.
महेश घरबुडे. अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. कारण गॅस नसल्यामुळे मेस बंद आहेत.आणि मेस बंद असल्यामुळे बाहेर जेवण करावे लागत आहे. बाहेरचे जेवण आमच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. यामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. बरेच विद्यार्थी संकटात आहेत. सकाळी एखाद्या ठिकाणी जेवण केले तर संध्याकाळी कुठे जेवण मिळेल याचा प्रश्न असतो. त्यामुळे अभ्यासातही लक्ष लागत नाही.
प्रदीप हंडाळ, विद्यार्थी
मराठवाड्यातील एका छोट्या गावातून मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलो आहे. सध्या मी टिळक कॉलेजला बीएडचे शिक्षण घेत आहे. परीक्षा तोंडावर आलेली आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. तेवढ्यात पुण्यामध्ये गॅस संपल्यामुळे मेस बंद झाली आहे. मी स्वतः माझ्या रूमवर भात बनवून खात आहे. कारण बाहेरचे महागडे जेवण परवडत नाही.
स्वप्निल कदम, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT