Coconut Pudhari
पुणे

Pune Coconut Market: पुण्यात वर्षाला सात कोटी नारळांची विक्री; ८० ते १०० कोटींची उलाढाल!

तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून गुलटेकडी मार्केट यार्डात आवक; गणेशोत्सवातच तब्बल २० लाख नारळांची विक्री

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: देवापुढे हात जोडले की प्रसादाच्या ताटात नारळ हमखास दिसतो... नव्या कामाची सुरुवात असो, घराची वास्तुशांती असो, लग्नातील विधी असो किंवा सत्काराचा कार्यक्रम; नारळाशिवाय अनेक धार्मिक-सांस्कृतिक विधी अपूर्णच. दुसरीकडे हॉटेलच्या स्वयंपाकघरात चटणीपासून सांबार, भाजी आणि विविध खाद्यपदार्थांची चव वाढविण्यासाठीही नारळ हवाच. पुणेकरांच्या श्रद्धेपासून खाद्यसंस्कृती पर्यंत घट्ट रुजलेल्या या नारळाचा बाजारही तितकाच मोठा आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात वर्षभरात सुमारे सात कोटी नारळांची विक्री होत असून, त्यातून ८० ते १०० कोटी रुपयांची उलाढाल होते.

शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पोहोचणाऱ्या या कोट्यवधी नारळांचा पुण्यापर्यंतचा प्रवास हजारो किलोमीटर दूर सुरू होतो. तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नारळाने भरलेल्या गाड्या गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल होतात. केरळमधूनही काही प्रमाणात माल येतो. मार्केट यार्डात दररोज सरासरी दोन लाख नारळांची आवक होते. अर्थात, सण-उत्सव आणि हंगामानुसार त्यात चढ-उतार होतो. आलेल्या मालापैकी सुमारे निम्मा पुणे शहरात, ३० टक्के पिंपरी-चिंचवडमध्ये, तर उर्वरित २० टक्के जिल्ह्यात विकला जात असल्याची माहिती मार्केट यार्डातील नारळाच्या व्यापाऱ्यांनी दिली.

मागणीला उधाण

आषाढ सुरू झाला की नारळाच्या मागणीचा आलेख वर सरकू लागतो. श्रावण, भाद्रपद आणि अश्विनपर्यंत बाजारातील लगबग कायम राहते. त्यात गणेशोत्सव म्हणजे नारळ विक्रेत्यांसाठी सर्वाधिक उलाढालीचा काळ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, सारसबाग गणपतीसह शहरातील विविध धार्मिक स्थळे आणि गणेश मंडळांकडून मोठी मागणी नोंदविली जाते. गणेशोत्सवाच्या काळातच सुमारे २० लाख नारळांची विक्री होते.

पाऊस कमी; नारळही महाग

नारळाचा हा प्रवास यंदा मात्र थोडा महागला आहे. काही उत्पादक पट्ट्यांत कमी पाऊस झाल्याने उत्पादनाबरोबर नारळाच्या आकार आणि दर्जावरही परिणाम झाला. परिणामी, बाजारात दर अपेक्षेप्रमाणे खाली आलेले नाहीत. ते अद्याप चढेच आहेत. पूजेच्या ताटापासून हॉटेलच्या स्वयंपाकघरापर्यंत नारळाची गरज कायम असल्याने त्याला बारमाही बाजार मिळतो. दरवर्षी सरासरी पाच ते दहा टक्क्यांची वाढ होत असल्याचे व्यापारी सांगतात.

पूर्वी ग्राहक नारळ घेताना प्रामुख्याने किंमत आणि आकार पाहायचे. आता मात्र दर्जा, खोबरे आणि कोणत्या कामासाठी नारळ हवा आहे, याचा विचार करून खरेदी केली जाते. अनेक वर्षांच्या व्यवसायात ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलताना पाहिल्या आहेत. पूर्वी सणांच्या काळातच मोठी मागणी असायची; आता हॉटेल व्यवसाय आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वर्षभर नियमित मागणी राहते.
दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT