Road Development Pudhari
पुणे

Pune Mission 32 Roads: पुण्यात ‘मिशन 32’ला वेग; शहर परिवर्तन समितीचे महत्त्वाचे निर्णय

रस्ते, पाणी व वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासनाचा समन्वय वाढवणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरासमोरील वाढत्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी आणि विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी ‌‘शहर परिवर्तन समिती‌’ स्थापन केली असून, या समितीची दुसरी बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच मिशन 32 मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील 12 ‌‘मिसिंग लिंक‌’ रस्त्यांच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. बाणेर-पाषाण लिंक रोड, वाकड-कस्पटेवस्ती मार्ग, आंबेडकर चौक ते राजाराम पूल रस्ता आणि वारजेतील रोझरी स्कूल ते तिरुपतीनगर या प्रमुख मार्गांवरील भूसंपादन, मोजणी व अतिक्रमण हटविण्यात येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. संबंधित विभागांनी वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शहरातील प्रमुख 32 रस्त्यांसाठी ‌‘मिशन 32‌’अंतर्गत कामे युद्धपातळीवर हाती घेण्याचे व नव्याने समाविष्ट गावांमधील प्रत्येकी एक प्रमुख रस्ता विकसित करण्यासाठीही कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. भूसंपादन प्रस्ताव तातडीने सादर करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

फुटपाथवरील अडथळे दूर करण्यासाठी 32 रस्त्यांवरील फीडर पिलरचे सादरीकरण करण्यात आले. याबाबत एमएसईडीसीएलला डिझाईन मंजूर करून पिलर तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, रस्ते व वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी महापालिकेच्या सहा मोबाईल ॲप्स आणि वाहतूक पोलिसांच्या ॲपमध्ये समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली.

पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या (वॉटर लॉगिंग) ठिकाणांवर उपाययोजना करण्यासाठी परिमंडळनिहाय कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वनविभागाच्या अडचणींमुळे रखडलेल्या भूसंपादन प्रस्तावांना गती देण्यावर भर देण्यात आला.

वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर रिक्षाथांबे निश्चित करणे, बेवारस वाहने हटविणे आणि काही महत्त्वाच्या मार्गांवर ‌‘पे अँड पार्क‌’ योजना राबविण्याबाबतही चर्चा झाली. पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक असलेल्या टाक्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT