Pune roads cycle race preparation
पुणे: टूर-दी-फ्रान्सच्या धर्तीवर होणार्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्ते गुळगुळीत होणार आहेत. या स्पर्धेचा 75 कि.मी.चा मार्ग शहरातून जात असून, या सर्व मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे. ही स्पर्धा येत्या जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेतून सायकलपटूंना थेट 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी पात्रतेची संधी मिळणार असल्याने या स्पर्धेकडे जागतिक स्तरावर लक्ष लागले आहे.
या स्पर्धेच्या 684 किलोमीटरच्या मार्गांपैकी 75 किलोमीटरचा टप्पा पुणे शहरातून जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबरदुरुस्ती, पादचारी मार्गदुरुस्ती आणि अतिक्रमण हटविण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. (Latest Pune News)
यासाठी 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून, निविदा प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. ‘यूसीआय’च्या 2.2 स्टेज रोड रेस मानांकन असलेली ही देशातील पहिलीच स्पर्धा असून, तिला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
रस्त्यांची दुरवस्था
या स्पर्धा मार्गातील रस्त्यांवरील चेंबर खराब व तुटलेले आहेत. काही ठिकाणी रस्ते वर - खाली झाले आहेत. तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ते दुरुस्त केल्यामुळे पाठीला हादरे बसतात. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांत या स्पर्धा मार्गातील रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. यासाठी प्रशासनाने 145 कोटी 75 लाख 80 हजार 212 रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. त्याला सोमवारी पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिट) मान्यता दिली.
असा आहे सायकल मार्ग...
बालेवाडी-सूस- पाषाण-पुणे विद्यापीठ- राजभवन मार्ग- राजीव गांधी पूल-एसबी रोड- लॉ कॉलेज रोड- प्रभात रस्ता-डेक्कन जिमखाना-गोपाळकृष्ण गोखले रस्ता- शिवाजीनगर- जंगली महाराज रस्ता (28 कि.मी.)
कर्वेरस्ता- नळस्टॉप- सुतार दवाखाना- वनाज कॉर्नर- एसएनडीटी- म्हात्रे पूल (8.5 कि.मी.)
शास्त्री रस्ता-टिळक रस्ता-बाजीराव रस्ता-शनिवारवाडा-मंडई- शिवाजी रस्ता-खडकमाळ अळी- हिराबाग- सारसबाग- मित्रमंडळ चौक-महर्षीनगर- नेहरू रस्ता- जुनी जिल्हा परिषद- लालमहल- शनिवारवाडा- शिवाजी पूल (2.30 कि.मी.)
कॅन्टोन्मेंट हद्द- नवी व जुनी जिल्हा परिषद- रेड चर्च- महात्मा गांधी रस्ता- गुरुद्वारा रस्ता- रेसकोर्स-राष्ट्रीय युद्धसंग्रहालय-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- नवीन जिल्हा परिषद (8.2 कि.मी.)
ईस्ट स्ट्रीट- पूलगेट- गोळीबार मैदान- लुल्लानगर- कोंढवा-खडी मशीन चौक- येवलेवाडी- बोपदेव घाट (12.80 कि.मी.)
खडकवासला चौपाटी - कोळेवाडी- किरकटवाडी- नांदेड सिटी (5 कि.मी.)
चार टप्प्यांत होणार रस्तेदुरुस्ती
टप्पा 1 : 9.47 कि.मी. रस्त्यासाठी 30.80 कोटी
टप्पा 2 : 28.53 कि.मी. रस्त्यासाठी 32.67 कोटी
टप्पा 3 : 14.32 कि.मी. रस्त्यासाठी 38.22 कोटी
टप्पा 4 : 22.47 कि.मी. रस्त्यासाठी 44.05 कोटी
एकूण खर्च : जीएसटीसह 145.75 कोटी रुपये